जळगाव: जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक नवीन वर्षात ३ जानेवारीला होत आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर ६ जानेवारीला विषय समिती सभापती निवड होणार आहे. तत्पूर्वी काल शनिवारी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत भाजपच्या सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि पक्ष नेत्यांची बैठक झाली. यात अध्यक्ष रावेर लोकसभा मतदार संघातून तर उपाध्यक्ष जळगाव लोकसभा मतदार संघातून करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. जि.प.पदाधिकारी निवडीमुळे राजकारण तापले आहे. बहुमत नसतानाही महाविकास आघाडीने देखील जि.प.वर सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर फोडाफाडीचे राजकारण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून भाजपचे सर्व जिल्हा परिषद सदस्य आज रविवारपासून सहलीवर जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.
३ जानेवारीपर्यंत सर्व जिल्हा परिषद सदस्य जिल्ह्याच्या बाहेर असणार आहे. रविवारी दुपारपर्यंत सर्व जिल्हा परिषद सदस्यांना अध्यक्षांच्या निवासस्थानी उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या असून त्यानंतर पुढील नियोजन केले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. याबाबत काही सदस्यांशी संपर्क साधले असता सदस्य सहलीवर जाणार असल्याच्या माहितीला अधिकृत पुष्टी मिळाली.