रांची: झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीपासून झारखंड मुक्ती मोर्चा आणि कॉंग्रेस आघाडीने बहुमताकडे वाटचाल केल्याचे दिसून आले. बहुमतासाठी ४१ जागांची आवश्यकता असताना जेएमएम, कॉंग्रेस आघाडीकडे ४२जागांवर आघाडी होती. मात्र आता आकडेवारी फिरली असून पुन्हा कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याचे दिसून येत आहे. भाजपने पुन्हा जोरदार पुनरागमन केले आहे. आताच्या आकडेवारीनुसार झारखंड मुक्ती मोर्चा आणि कॉंग्रेस आघाडीकडे ३८ जागांवर आघाडी आहे तर भाजपने ३३ जागांवर आघाडी घेतली आहे. बदललेल्या आकडेवारीनुसार भाजप सरकारमध्ये येऊ शकते. अपक्ष आणि इतर पक्षासोबत जाऊन भाजप सत्तेत येऊ शकते.
झारखंड विधानसभेत एकूण ८१ जागा आहेत. त्यामुळे बहुमत गाठण्यासाठी ४१ जागा जिंकण्याची आवश्यकता आहे. झारखंडमधील सत्ता कायम राखण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी संपूर्ण ताकद लावली होती. परंतु त्याच्या मानाने निकाल येताना दिसत नसल्याने भाजपसाठी चिंतेची बाब आहे.