बीड: स्व.गोपीनाथराव मुंडे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त गोपीनाथ गडावर मेळावा सुरु आहे. यावेळी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. मी १ डिसेंबर रोजी मेळाव्यासाठी फेसबुकवर पोस्ट लिहून १२ डिसेंबरच्या मेळाव्यासाठी आमंत्रण दिले. मात्र या पोस्टचा चुकीचा अर्थ काढला गेला आणि मी पक्ष सोडेल अशी अफवा पसरविली गेली. मात्र भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे, ते सोडून मी कोठेही जाणार नाही असे सांगत पंकजा मुंडे यांनी पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम लावले. मी पक्ष सोडणार नाही मात्र पक्षाने मला सोडायचे असेल तर सोडावे असा इशाराही पंकजा मुंडे यांनी दिला. मला भाजपच्या कोअर कमिटीतून मुक्त करा असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. आजपासून मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीने काम करणार असल्याचे सांगून त्यांनी भाजपचे काम करणार नसल्याचा इशाराही दिला आहे.
यावेळी पंकजा मुंडे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. कोणाचेही नाव न घेता पंकजा मुंडे यांनी पक्ष नेतृत्त्वावर टीका केली. पाच वर्षात आमचे सरकार असताना गोपीनाथ मुंडेंचे स्मारक झाले नाही. त्यामुळे या सरकारकडे कोणत्या तोंडाने मी स्मारक बांधण्याची मागणी करू अशी खंत देखील पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. स्मारक पाच वर्षात झाले नाही आणि आता करूही नका असेही आवाहन पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले.
मला जनतेसाठी काम करायचे आहे, मी कधीही घरात बसणार नाही. मी काम सुरु करणार आहे. २७ जानेवारीला मराठवाड्याच्या सिंचन प्रश्नासाठी मी एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असून पुन्हा कामाला सुरुवात करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.