मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे. आज संध्याकाळी शपथविधी होत आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेत आहे, तर त्यांच्यासोबत शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ आमदार कॅबिनेट पदाची शपथ घेत आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र येण्यापूर्वी किमान समान कार्यक्रम अर्थात (मिनिमम कॉमन प्रोग्राम) तयार केला आहे. तो आज जाहीर करण्यात आला. संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मिनिमम कॉमन प्रोग्राम जाहीर करण्यात आला आहे. शेतकरी, बेरोजगारी, महिला, उद्योग, आरोग्य आदी मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मिनिमम कॉमन प्रोग्रामची घोषणा केली.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, शासकीय पदे भरून तरुणांना रोजगार द्यावा, महिलांना सुरक्षा द्यावी, नवीन उद्योग उभारून रोजगार निर्मिती करण्यावर मिनिमम कॉमन प्रोग्राममध्ये भर देण्यात आला आहे.
राज्यातील प्रत्येक नागरिकांना आरोग्य विमा देणार, सरकारी कार्यालयातील शासकीय पदे तत्काळ भरणार, शहर आणि जिल्ह्यात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह उभारणार, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचे आश्वासन मिनिमम कॉमन प्रोग्राममध्ये देण्यात आले आहे.