मुंबई: काल गुरुवारी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासह ६ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आज मुख्यमंत्र्यांनी पदभार देखील स्वीकारला. दरम्यान महाविकास आघाडीच्या सरकारची उद्या अग्निपरीक्षा अर्थात विश्वासदर्शक ठराव होणार आहे. सरकार स्थापनेनंतर हा ठराव जिंकणे महाविकास आघाडीसाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यास सरकार कायम राहणार आहे. महाविकास आघाडीने आपल्या आमदारांना मुंबईतच थांबण्याचे आदेश दिले आहे. आज राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. थोड्याच वेळात राज्यपाल त्यांना शपथ देणार आहे.
बहुमतासाठी १४४ संख्याबळ आवश्यक आहे तर महाविकास आघाडीने त्यांच्याकडे १६५ संख्या असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्ष विश्वासदर्शक ठरावावेळी १७५ पेक्षा अधिक संख्याबळ असेल असाही दावा केला जातो आहे.
विश्वासदर्शक ठरावापूर्वी बहुमत नसल्याचे ओळखून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे उद्याच्या विश्वासदर्शक ठरावाकडे विशेष लक्ष लागले आहे.
आमदारांना शपथ देण्यासाठी भाजपचे कालिदास कोळंबकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, मात्र आता त्यांच्या जागी दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष पदावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरु होती. मात्र आता विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेले असून कॉग्रेसकडे उपमुख्यमंत्री पद जाणार असल्याचे बोलले जात आहे.