मुंबई: राज्यात सत्ता संघर्ष सुटला नसल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली. मात्र अद्यापही कोणताही पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करू शकलेला नाही. दरम्यान भाजपला १०५ जागा मिळाल्या आहेत आणि अपक्ष १९ आमदारांनी पाठींबा दिले असल्याने राज्यात भाजपशिवाय सरकार स्थापन होऊच शकत नाही असे सांगत भाजप सरकार पुन्हा येईल असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी हा विश्वास व्यक्त केला असल्याचे चंद्रकात पाटील यांनी सांगितले.
कालपासून मुंबईत भाजपची बैठक सुरु आहे. नवनियुक्त आमदार, विधान परिषदेचे सदस्य, पराभूत झालेले उमेदवार यांची बैठक झाली असून त्यांना पुढील रणनीतीबाबत सूचना करण्यात आले असल्याची माहिती चंद्रकात पाटील यांनी सांगितले आहे.
निवडणुकीत जनतेने महायुतीवर विश्वास दाखवला होता. भाजपला १ कोटी ४२ लाख मते मिळाली आहे. सर्वाधिक मते आम्हाला मिळाली आहे त्यामुळे सरकार आमचेच होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बूथ लेव्हलला भाजप मजबूत असल्यानेच भाजपला सर्वाधिक मते मिळाली, त्यामुळे बूथ अधिक मजबूत करण्यासाठी काम करण्याबाबत सूचना करण्यात आल्या.