BREAKING: शिवसेनेची कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची तयारी सुरुवातीपासून होती: देवेंद्र फडणवीस

0

मुंबई: राज्यातील सत्ता संघर्ष शिंगेला पोहोचला आहे. सत्ता स्थापनेचा तिढा आज शेवटच्या दिवसपर्यंत सुटलेला नाही. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. आज मुख्यमंत्री राजीनामा देणार असल्याचे बोलले जात होते अखेर त्यांनी राजीनामा दिला आहे.

राज्यपालांकडे माझा राजीनामा सादर केला आहे. राज्यपालांनी तो स्वीकारला आहे. महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. आमचे नेते मोदी, अध्यक्ष अमित शहा यांचे आभार मानतो. पाच वर्ष माझ्यासोबत काम करणारे मंत्री, पक्षाचे नेते, कार्यकर्ते, अधिकारी, आमचा मित्र पक्ष शिवसेना त्यांचे नेते यांचे आभार मानतो. राज्याच्या विकासासाठी अनेक कामे केली, दुष्काळ मुक्तीसाठी मी मुख्यमंत्री असताना झाले. रस्त्यांची जाळे आम्ही उभारले.

या निवडणुकीत आमचा स्ट्राईक रेट वाढला. ७० टक्के आमचा स्ट्राईक रेट राहिला. आमच्या कामाची पावती महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला दिली. दुर्दैवाने अपेक्षेपेक्षा जागा कमी निवडून आलेत. त्यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सरकार बनविण्याचे आमचे सगळे मार्ग खुले असल्याचे सांगितले, तो आमच्यासाठी धक्कादायक होता. लोकांनी महायुतीला मतदान केले असताना उद्धव ठाकरे यांचे विधान आमच्यासाठी धक्कादायक होते. आमचे सर्व पर्याय खुले असल्याचे विधान त्यांनी का केले असावे हा आमच्यासाठी मोठा प्रश्न होता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मी अनेकवेळा उद्धव ठाकरे यांना फोन केले मात्र त्यांनी फोन उचलले नाही. चर्चेची दारे शिवसेनेने बंद केले आम्ही नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आमच्याशी चर्चा न करता कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा करणे योग्य नव्हते.