BREAKING: स्वत:हून ईडीच्या कार्यालयात जाणार: शरद पवार

0

मुंबई: शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० नेत्यांवर ईडीने गुन्हा दाखल केले आहे. दरम्यान यावरून आज संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निदर्शने होत असताना आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. मी स्वत:हून शुक्रवारी २७ रोजी दुपारी २ वाजता ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.

मला अध्याप ईडीची नोटीस मिळालेली नाही, मात्र प्रचारासाठी पुढील महिनाभर मुंबई बाहेर असणार असल्याने मी स्वत:हुन ईडीच्या कार्यालयात जाऊन माझ्यावरील आरोपाची शहानिशा करणार आहे. ईडीला मी पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. संपूर्ण महाराष्ट्रात माझ्या पक्षाला मिळत असलेल्या प्रतिसादाला पाहून भाजपचे पोटसूळ उठले आहे. त्यामुळेच ही कार्यवाही होत असल्याचे आरोप शरद पवार यांनी केले आहे.

दिल्लीच्या तख्त्यासमोर झुकणार नाही

माझ्या आयुष्यातील अशा प्रकारच्या कारवाईचा दुसरा प्रसंग आहे. महाराष्ट्र हा कधीही दिल्लीच्या तख्त्यासमोर झुकलेले नाही, आताही झुकणार नाही असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.