भुसावळ प्रतिनिधी – गुन्हेगारीमुळे बदनाम झालेल्या भुसावळ शहरात दोन जणांची निर्घृण हत्या झाल्याने शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भुसावळ शहरातील बालाजी लॉनमागील शगुन इस्टेटमध्ये रेल्वे कर्मचाऱ्याने आपल्या वयोवृद्ध आईसह पत्नीचा निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली आहेत.
या घटनेने शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. खूनाचे स्पष्ट कारण समोर आले नसलेतरी कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा अंदाज आहे. आराध्या हेमंत भूषण (२३) व सुशीलादेवी भूषण (६३) अशी मयतांची नावे आहे. या प्रकरणी संशयित आरोपी तथा रेल्वे कर्मचारी हेमंत श्रवणकुमार भूषण यास अटक करण्यात आली आहे. संशयित हेमंत श्रवणकुमार भूषण हा भुसावळ रेल्वे विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे. पत्नी आराध्या व आई सुशीलादेवी यांच्यासह तो वांजोळा रोड, बालाजी लॉजमागील शगुन इस्टेटमध्ये काही महिन्यांपूर्वीच वास्तव्यास आला होता. अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले असून पत्नी आवडत नसल्याने त्याचे मंगळवारी मध्यरात्री भांडण झाले व आईने वादात मध्यस्थी केल्याने त्याने ६३ वर्षीय आईचा तसेच २४ वर्षीय पत्नीचा डोक्यात लोखंडी वस्तू मारून निर्घृण खून केला. पाच महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या आरोपी हेमंतला पत्नी आराध्या आवडत नसल्याने त्यांच्यात या ना त्या कारणावरून नेहमीच खटके उडत होते. दाम्पत्याला वाद मिटवण्यासाठी मुंबईतील उच्चशिक्षीत सॉप्टवेअर अभियंता तथा आरोपीचा शालक ऋषभ (२६) हा सोमवारीच भुसावळात आला होता मात्र मंगळवारी पहाटे दाम्पत्यात कुठल्यातरी कारणावरून जोरदार कडाक्याचे भांडण झाले व आरोपीने संतापाच्या भरात लोखंडी वस्तूने आईसह पत्नीच्या डोक्यात मारल्याने दोघांचा अतिरक्तस्त्राव होवून मृत्यू झाला तर ऋषभ हा देखील जख झाला. ऋषभने हा प्रकार स्थानिक बाजारपेठ पोलिसांना कळवला पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला, सहाय्यक निरीक्षक हरीष भोये व बाजारपेठ कर्मचारी घटनास्थळी दाखल असून त्यांच्याकडून खुनाची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.