धाक, दडपशाहीचे धोरणाचा अवलंब ; व्यापारी बेमुदत बंदवर ठामः व्यापार्यांनीही सुरेश दादा जैन यांचीही घेतली भेट
जळगाव- शेतकरी आणि व्यापारी हिताचे निर्णय घेण्याऐवजी पद मिळताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतींना व्यापार्यांना अंधारात ठेऊन 300 मिटरची कुंपण भिंत चक्क सुटीच्या दिवशी पाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. व्यापार्यांना कुठलीही पूर्वसुचना न देता तसेच नियमबाह्य पध्दतीने भिंत पाडल्याचा आरोप करत पुन्हा पर्यायी संरक्षण भिंत बांधून देण्यासाठी मागणीसाठी व्यापार्यांनी बेदमुत बंदचे अस्त्र उगारले आहे. बेमुदत बंदच्या पहिल्याच दिवशी बंद मागे अन्यथा प्रत्येक दुकानदारांना नोटीसा बजावून येवून कारवाई करण्यात येईल, अशी धमकी भाजपच्या मंत्र्याच्या जवळच्या एका बिल्डरने व्यापार्यांना दिल्याचा प्रकार समोर आला आहे. धमकी देणार्या हे भाजप नेत्याच्या अगदी जवळचे तसेच नियोजीत व्यापारी संकुलाचे काम घेतलेले ठेकदार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या धमकीनंतरही व्यापारी मात्र बेदमुदत बंदवर ठाम आहे. दरम्यान याप्रकरणी व्यापार्यांनी सोमवारी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचीही भेट घेतली.
कृषी उत्पन्न बाजार समितीची भाजीपाला मार्केट ते धान्य मार्केट पर्यंतची सुमारे 300 मीटर लांबीची कुंपण भिंत पाडण्याचा निर्णय होवून 7 रोजी सायंकाळी बाजार समिती बंद झाल्यावर महापालिकेचे भिंत पाडण्याबाबत पत्र प्राप्त झाले. आज दुसरा शनिवार सुटीच्या दिवशी भिंत पाडण्यात आली. तसेच भिंत पाडण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची बैठक किंवा व्यापार्यांशी चर्चा न करताच हा निर्णय झाला तसेच भिंत पाडण्याआधी सहकार विभागाची देखिल परवानगी घेण्यात आलेली नाही. बाजार समितीची मालमत्ता अशा पध्दतीने तोडण्याआधी संचालक मंडळाच्या बैठकीत विषय का घेण्यात आला नाही? असे प्रश्न उपस्थित व्यापार्यांनी पत्रकार परिषद घेवून उपस्थित करुन करुन अर्थकारणातून प्रकरण घडल्याचा संशय व्यक्त केला होता. भिंत पाडल्यानंतर सकाळी 11 वाजेच्या सुमारास आडत असोसिएशनची बैठक झाली . या बैठकीत भिंत पाडल्याचा मुद्दा प्रभावीपणे उपस्थित करण्यात आला . यात व्यापार्यांनी भिंत पाडण्याअगोदर आम्हाला पूर्व सूचना द्यायला हवी होती अशी मागणी करून उघड्यावर पडलेले धान्य चोरीला जाण्याची भीती असून पाऊस अचानक आल्यास रस्त्यावरील पाणी आत शिरून धान्य खराब होणार असल्याचे सांगितले. यावर तोडगा काढण्यात यावा अन्यथा व्यापारी सोमवारपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा बैठक घेवून देण्यात आला होता.
नवीन भिंत बांधून द्या, अन्यथा बेदमुत बंद
भिंत पाडण्याआगोदर व्यापार्यांना पूर्व सूचना द्यायला हवी होती . मात्र ती न दिल्याने आणि व्यापार्यांचा माल उघड्यावर आल्याने तो चोरीस जाण्याची भीती असून अचानक पाऊस आल्यानंतर माल खराब होईल नुकसानाचा धोका आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत पुन्हा नवीन संरक्षण भिंत बांधून देण्यात यावी, या मागणीसाठी व्यापार्यांनी सोमवारी सकाळपासून बेदमुत बंदला सुरुवात केली. याठिकाणी आडत असोसिएशनच्या हॉलमध्ये आडत असोसिएशनच्या अध्यक्ष, पदाधिकार्यांसह व्यापार्यांचीही बैठक झाली. या बैठकीत कृऊबा प्रशासनातर्फे नवीन संरक्षण भिंत बांधून देईपर्यंत बेमुदत बंद सुरुच राहील, असा निर्धार व्यापार्यांनी केला. बेदमुत बंदला व्यापारी महामंडळ, दाणा बाजार संघटनेने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. बंदबाबत मार्केट आडत असोसिएशनने कृउबा सभापतींना निवेदन दिले आहे. यात संरक्षण भिंत कोणाच्या आदेशाने पाडली? नियोजित व्यापारी संकुलाची वर्कऑर्डर दिलेल्या विकासाकाकडून अटी-शर्ती पाळल्याबाबतचा खुलासा करावा, संरक्षक भिंत तोडण्यासारखे गैरप्रकार पुन्हा होणार नाही. याची लेखी हमी सभापतींनी द्यावी, असे म्हटले असून या मागण्या मान्या झाल्यावरच बंद मागे घेण्यात येईल, असे कळविले आहे.
कोट्यवधींची उलाढाल ठप्प
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 100 ते 145 दुकाने आहेत. शेतकरी त्याचा माल घेवून येतो, व्यापारी ते खरेदी करतात, यानंतर त्याची विक्री होते. त्यातून कृऊबा मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते. दरम्यान व्यापार्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे लाखोचीं उलाढाल ठप्प झाली आहे. सोमवारी बंदच्या पहिल्याच दिवशी कृऊबाध्ये शुकसर्व व्यापार्यांची दुकाने बंद असल्याने शुकशुकाट दिसून आला. त्यामुळे रोजची होणारी उलाढाल ठप्प झाल्याने बंदच्या पहिल्याच दिवशी कृऊबाला फटका बसला. सोमवारी मार्केटमध्ये शुकशुकाट दिसून आला. दरम्यान बेमुदत व्यापार्यांचा बंद असल्याने कोट्यवधीची उलाढाल ठप्प होवून उत्पन्न स्वरुपात कृऊबाचे मोठे नुकसान होणार आहे. दरम्यान यावर काही पर्याय काढावा, व नुकसान टाळावे अशी सूर निघत आहे.
‘त्या’ बिल्डरची बंद मागे घेण्यासाठी धमकी
व्यापार्यांनी शेतकरी आणि सामान्य व्यक्तींकड़े पाहून बंद मागे घ्यावा असे आवाहन सभापती कैलास चौधरी यांनी दिले असून यात रस्त्यावरून पाणी आत येणार नाही याची काळजी घेऊ असे सांगत सुरक्षा व्यवस्थेत वाढ करू असे सांगितले आहे . मात्र एवढ्यावर समाधानी न झालेल्या व्यापार्यांनी बंद सुरूच ठेवणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. तसेच बैठकीत बोलताना व्यापार्यांनी गस्त दिसली नसल्याचे सांगत भिंत बांधावी यावर आग्रही भूमिका घेतली. यानंतर व्यापारी कृषी उत्तन्न बाजार समितीत उभे असताना, नियोजीत व्यापारी संकुलाचा बांधकामाचा ठेका असलेल्या भाजप मंत्र्याच्या जवळच्या त्या बिल्डराने व्यापार्यांना बंद मागे घ्या, अन्यथा दुकानांवर नोटीस चिटकविण्यात येतील, व यानंतर कुठलीही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती एका व्यापार्याने नाव छापण्याच्या अटीवर दिली आहे. नोटीस नेमकी कशाची असेल असे विचारले असता व्यापार्याने नोटीस म्हणजेच बिल्डरसह कृऊबा प्रशासनाला त्याव्दारे हवी ती मनमानी पध्दतीने कारवाई करता येईल, असे सांगितले. दरम्यान धमकीला कुठल्याही प्रकारची भित नसून तसेच भिक घालणार नसून कायदेशीर लढा देणार असून पर्यायी भिंत बांधण्यात येईपर्यंत बंद सुरुच राहिल, असेही व्यापार्यांनी सांगितले.
व्यापार्यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची घेतली भेट
भिंत पाडल्याच्या प्रकरणी आडत असोसिएशनचे अध्यक्ष अशोक राठी यांच्या व्यापारी तसेच 60 ते 70 व्यापार्यांनी न्याय मिळवून द्यावा, यासाठी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची भेट घेतली. यावेळी व्यापार्यांनी सुरेशदादांना प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात येवून प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगण्यात बाजू मांडली. त्यावर सुरेश जैन यांनीही भिंत पाडण्याचा प्रकार नियमबाह्य तसेच चुकीचा असून याप्रकरणी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करु असे आश्वासन व्यापार्यांना दिले.
कृऊबा समोरील झाडे तोडणार्यांवर गुन्हा दाखल करा
कृऊबा समोर कृऊबा प्रशासनाने स्वखर्चाने आठ ते दहा फुटाची 128 झाडे लावली होती. कुठलाही ठराव नसतांना, मनमर्जी पध्दतीने विनापरवानगी ही झोडे तोडण्यात आली आहे. परवानगी न घेता, झाडे तोडणार्यांवर योग्य ती कारवाई करावी व फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी लेखी तक्रार शिवसेनेचे गजाजन मालपुरे यांनी 10 रोजी आयुक्तांकडे केली आहे. येत्या 24 तासाच्या आत चौकशी करुन गुन्हा दाखल करावा, तसेच यातून महापालिकेचे झालेले लाखोंचे नुकसान व त्यावरील दंड व्याज वसूल करावे असेही तक्रारीत म्हटले आहे.