मोबाईल दुरूस्तीचे दुकान ; स्थानिक गुन्हे शाखेने बुलेटसह घेतले ताब्यात
जळगाव- सुरत येथे मामाच्या गावाला मोबाईल प्रशिक्षणासाठी गेला अन् त्याठिकाणी पार्किंगमधून बुलेट चोरणार्या योगेश संजय गाडीकर वय 23 याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुलेटसह ताब्यात घेतले आहे. बुलेट चोरल्यावर तो त्याच बुलेटवरुन जळगावा आला अन् सद्यस्थितीत तिच्यावरच वावरत असल्याची माहिती मिळाली आहे.
दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमिवर पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांना सुचना केल्या होत्या. त्यानुसार रोहम यांनी कर्मचार्यांना दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सुरज पाटील यांना एक तरुण भुसावळ तसेच साकेगाव परिसरात चोरीची बुलेट फिरवित असल्याची माहिती मिळाली. याबाबत त्यांनी पोलीस निरिक्षक रोहम यांना माहिती दिली. त्यांनी सुरज पाटील यांच्याहस सहाय्यक फौजदार अशोक महाजन, विजयसिंग पाटील, सुनिल दामोदरे, युनूस शेख, कमलाकर बागुल, सुरज पाटील, गफूर तडवी, इद्रिस पठाण, प्रविण हिवराळे यांचे पथक नियुक्त केले.
संशयित बुलेटसह गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुरज पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार पथक संजय गाडीकर यांच्यावर पाळत ठेवून होते. साकेगाव परिसरात बुलेटवरुन फिरतांना आढळून येताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 1 लाख रुपये किमतीची दुचाकी ताब्यात घेतली आहे. सुरत येथील समीमेर हॉस्पिटल येथून 10 ऑगस्ट 2018 रोजी बुलेट चोरल्याची कबूली दिली. याप्रकरणी गुजरात राज्यातील वराढा पो.स्टे.ला गुन्हा दाखल असल्याने त्याला पुढील कारवाईसाठी तेथील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.