वरणगांवात साजरी होणार बैलपोळा स्पर्धा

( तिस वर्षापासून खंडीत झालेल्या स्पर्धेला यंदापासून होणार सुरुवात )

वरणगांव । प्रतिनिधी

बळीराजाला बाराही महिने आपल्या शेती कामासाठी अथक साथ देणाऱ्या सर्जा – राजा अशा बैलजोडीचा शेतकरी बांधव बैल पोळा हा सण उत्साहाने साजरा करतात . अशा या शेतकऱ्यांचा आपल्या बैलजोडी विषयी आनंद द्विगुणित व्हावा यासाठी वरणगांव शहरातील खंडीत झालेला बैल पोळा सणाला वरणगांवला सदृढ अशा बैलजोडीची स्पर्धा यंदापासून सुरु करण्यात आली आहे . स्पर्धेतील उत्कृष्ठ व सदृढ अशा बैलजोडी मालकाला रोख बक्षीसे दिली जाणार आहेत .

 

वरणगांव शहरात ३० वर्षापूर्वी ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठ्या उत्साहाने बैल पोळा सण साजरा केला जात होता . या बैल पोळा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सदृढ अशा बैलजोडीच्या मालकाचा ग्रामपंचायतीच्या समिती मार्फत रोख बक्षीस, रुमाल टोपी व श्रीफळ देऊन गौरव केला जात होता . मात्र, हि परपंरा काही कारणास्तव खंडीत झाल्याने शेतकरी बांधवांचा झालेला हिरमोड पाहुन विविध कार्यकारी सोसायटी व वरणगांव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन यंदाच्या वर्षापासुन सार्वजनिक बैलपोळा सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे . त्यानुसार शहरातील गांधी चौक येथे दुपारी दोन ते पाच वाजेच्या सुमारास सार्वजनिक बैल पोळा सण साजरा केला जाणार असून या बैलपोळा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सदृढ व उत्कृष्ठ अशा बैल जोडीच्या शेतकरी मालकाला उत्साहपर प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पाचव्या क्रमाकांचे अनुक्रमे पाच हजार ते पाचशे रुपये रोख बक्षीस तसेच त्यांचा सत्कार केला जाणार आहे . यामुळे बैलजोडी धारक शेतकरी बांधवांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवण्याचे विविध कार्यकारी सोसायटी व वरणगांव शहर कृती समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी आवाहन केले आहे .