फेकरी गावात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोडी
[ मुद्देमाल हाती न लागल्याने चोरटे परतले रिकाम्या हाताने : चोरट्यांचा तपास सुरू ]
भुसावळ । प्रतिनीधी
तालुक्यातील फेकरी गावात चोरट्यांनी मध्यरात्री सहा कुलुप बंद घरांना लक्ष्य करीत घरफोडी केली . हि घटना सकाळी उघडकीस आल्याने गावातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .
तालुक्यातील फेकरी येथे शुक्रवारी रात्री चोरट्यांनी कुलुप बंद असलेल्या सहा घरांना लक्ष्य करीत घरफोडी केली . हि घटना सकाळी शेजारील रहीवाश्यांच्या लक्षात आल्याने गावात एकच खळबळ उडाली . तर या घटनेची खबर पोलीस पाटील किशोर बोरोले यांनी तालुका पोलीस ठाण्यातील पोलिसांना दिली. यामुळे घटनास्थळी पो.नि.बबन जगताप, सहा.पोनि.अमोल पवार यांच्यासह सहाय्यक श्यामकुमार मोरे, पो.हवलदार प्रेमचंद सपकाळे,योगेश पालवे यांनी गावातील संतोष कवटे, यशवंत बऱ्हाटे, सुरज मोरया, विनोद बोरोले व संस्कृतीनगर येथील सुभाष तायडे, प्रकाश मोरे यांच्या घराचे कुलूप व कळीकोंडा तोडत कपाटातील व घरातील सामान अस्ताव्यस्त केले असल्याचा पंचनामा केला. सदर चोरीत कोणत्याच प्रकारचा मुद्देमाल गेला नसल्याचे पोलिस कॉन्स्टेबल प्रेमचंद सपकाळे यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ सांगितले. घटनास्थळी जळगाव येथील श्वानपथक हजर झाले असता श्वानपथकाने चोरट्यांचा मार्ग महामार्ग क्र.६, वरील फेकरी बंद टोलनाक्याकडे दाखवला. तर घटने प्रसंगी चोरट्यांनी शेजारील रहिवाशांच्या घराला बाहेरुन कडी लावून बंद केले होते. मात्र, शेजारचे नागरिक जागी झाल्याचे समजताच चोर पसार झाले. तर पाच ते सहाच्या संख्येत चोरटे चारचाकी वाहनाने गावात शिरले व त्यांच्याकडे टॉर्च, छिन्नी,हातोडा व कुलुप तोडण्याचे इतर साहित्य असल्याचे एका नागरिकाने सांगितले. यामुळे चोरीच्या घटनेने फेकरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गावात रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे.
अनोळखी व्यक्तींची माहिती द्यावी
गावात संशयास्पद व्यक्ती फिरतांना आढळून आल्यास गावातील पोलीस पाटील, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांना कळवावे; असे सरपंच चेतना भीरुड, सामाजिक कार्यकर्ते संजय भिरूड व प्रशांत निकम यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.