पैनगंगा नदीत बस कोसळली, बसमधील महिला प्रवाशांचा मृत्यू

बुलढाणा l

मध्य प्रदेशात काल बस नदीत कोसळून १५ हुन जास्त प्रवाशी मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असताना मंगळवारी रात्री बुलढाणा जिल्ह्यात खासगी ट्रॅव्हल्स बस पैनगंगा नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये बसमधील एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला तर १७ जण जखमी झाले आहेत. या अपघाताचा तपास बुलडाणा पोलिस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाण्याच्या शेगाववरुन पुण्याला जाण्यासाठी निघालेल्या प्रवासी बसला मंगळवारी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास अपघात झाला. स्वरा ट्रॅव्हल्सच्या खासगी लक्झरी बसला हा अपघात झाला आहे. चिखली रोडवरील पेठजवळ ही घटना घडली. पेठ या गावाजवळ असलेल्या पैनगंगा नदीच्या पुलावरून बस खाली कोसळली.

 

ही लक्झरी बस जवळपास २५ ते ३० फूट खोल कोसळली. अपघातामध्ये बसमधील सर्व प्रवासी जखमी झाले आहेत. जवळपास २५ प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. या अपघातामध्ये एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर १७ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच पेठ येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. ग्रामस्थांनी बसमध्ये अडकलेल्या सर्व जखमींना बाहेर काढले. जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामधील तिघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचे कारण अद्याप समोर आले नाही. बुलढाण्यात काल आणखी एक भीषण अपघात झाला. बुलढाणा अजिंठा राज्य महामार्गावरील बुलढाण्यातील धाड नाका परिसरात डस्टर कारला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने जोरदार धडक दिली. त्यामध्ये सुदैवाने कोणाचा जीव गेला नसला तरीही किरकोळ जखमा झाल्या आहेत.