नवी दिल्ली: भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि रिलायंस जिओ या देशातील तिन्ही आघाडीच्या कंपन्यांनी राजधानी दिल्लीतील काही परिसरात सेवा बंद केली आहे. नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात देशभरात संतापाची लाट आहे. अनेक ठिकाणी आंदोलने होत आहे. आज देशभरात बंद देखील पुकारण्यात आले आये. दिल्लीत अपेक्षित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोबाइल कंपन्यांना सेवा बंद करण्याची निर्देश दिले होते. सरकारच्या निर्देशानंतर एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओ यांनी दिल्लीच्या अनेक भागांत व्हॉईस आणि इंटरनेटसह, एसएमएस सेवाही बंद केल्या आहेत.
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, सकाळी १० वाजेपासून एअरटेलची सेवा बंद करण्यात आली असून सेवा केव्हापर्यंत पूर्ववत केली जाईल याबात कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सरकारच्या आदेशानुसार, व्हॉइस, इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद करण्यात आली आहे. सेवा पूर्ववत करण्याचे आदेश मिळताच सेवा पुन्हा बहाल केली जाईल अशी माहिती एअरटेलच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीकडून देण्यात आली आहे. जिओ आणि व्होडाफोन-आयडियानेही दिल्लीतील बहुतांश भागात सेवा बंद ठेवली आहे. सकाळी ९ वाजेपासून व्होडाफोनची सेवा अधिकांश भागात बंद आहे. सरकारी आदेशानुसार सेवा बंद ठेवण्यात आली आहे, सरकारकडून पुढील आदेश मिळताच सेवा पूर्ववत केली जाईल असे स्पष्टीकरण व्होडाफोनने ट्विटरद्वारे दिले आहे.