खर्च सादर न करणार्‍या ११ उमेदवारांना नोटीस

0

दोन दिवसात म्हणणे सादर करा : निवडणूक अधिकार्‍यांनी बजावले

जळगाव : निवडणूक खर्च सादर न करणे, हिशेबात तफावत, खर्च तपासणीस गैरहजर राहणे अशा विविध कारणांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी रावेर मतदार संघातील ११ जणांना नोटीस काढल्या आहेत. यात युतीच्या उमेदवार रक्षा खडसे, आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह माघार घेतलेले सुनील पंडित पाटील, सुनील संपत जोशी, रवींद्र दंगल पवार यांचाही समावेश आहे. संबधितांना दोन दिवसात आपले म्हणणे सादर करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांसह उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रत्येक उमेदवाराने तसेच उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारानेही आपला निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक असताना रावेर मतदार संघातील ११ जणांनी निवडणूक खर्च सादर न केल्याने त्यांना रविवारी नोटीस काढण्यात आल्या आहेत. रावेर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांचा निरीक्षण नोंद वहीनुसार एक लाख ४३ हजार ८३५ रुपये खर्च झाला आहे. मात्र हा खर्च उमेदवाराकडे नमूद केलेला नसल्याने निवडणुकीचा खर्चाचा दैनंदिन हिशोब नियमानुसार ठेवलेला नसल्याच्या कारणावरून त्यांना नोटीस बजाणण्यात आली आहे. अशाच प्रकारे रावेर लोकसभा मतदार संघातीलच भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनाही याच कारणावरून नोटीस बजावण्यात आली आहे. खडसे यांचा खर्च एक लाख ३४ हजार ९९५ झाला असून हा खर्च उमेदवाराकडे नमूद केलेला नाही.उमेदवारी अर्ज दाखल करून माघार घेतलेले सुनील पंडीत पाटील, सुनील संपत जोशी, रवींद्र दंगल पवार यांनी खर्च सादर न केल्याने त्यांना नोटीस काढून दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे सूचित केले आहे. या व्यतिरिक्त गौरव दामोदर सुरवाडे (अपक्ष), अजित नामदार तडवी (राष्ट्रीय आम जनसेवा पार्टी), रोहिदास रमेश अडकमोल (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), योगेंद्र विठ्ठल कोलते (बहुजन समाज पार्टी), नजमीन शेख रमजान (अपक्ष), मधुकर सोपान पाटील (हिंदुस्थान जनता पार्टी) यांनी हिशोब सादर न करणे, आपली निवडणूक खर्च हिशोब नोंदवही घेऊन ११ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक खर्च शाखेत उपस्थित न राहणे या कारणांमुळे नोटीस बजावण्यात आल्या आहे आहेत. या सोबतच निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी आपली निवडणूक खर्च हिशोब नोंदवही घेऊन ११ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक खर्च शाखेत स्वत: अथवा प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्यासंदर्भात सूचित करूनही ११ रोजी उपस्थित राहिने नसल्याचाही उल्लेख नोटीसीत आहे. त्यामुळे दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे सूचित केले आहे.

सोशल मीडियासंदर्भातही नोटीस
सोशल मीडियावर विनापरवानगी जाहिरात केल्याबद्दल जळगाव व रावेर मतदार संघातील सात उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाजयांनी नोटीस बजावल्या आहेत. यात गुलाबराव देवकर, उन्मेष पाटील, रक्षा खडसे यांचाही समावेश आहे. निवडणूक लढविणार्‍या प्रत्येक राजकीय पक्ष व इतरही निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी निवडणुकीसंदर्भात प्रचारासाठी एसएमएस, जाहिरात व इतर प्रसिद्धीबाबत माध्यम प्रामाणिकरण आणि सनियंत्रण समितीची (एमसीएमसी) पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी यापूर्वीच उमेदवारांना कळविण्यात आले आहे. असे असले तरी जळगाव मतदार संघातील चार व रावेर मतदार संघातील तीन उमेदवारांनी परवानगी न घेता सोशल मीडियावर जाहिरात केल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या सातही उमेदवारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार अंजली बाविस्कर, बहुजन मुक्ती पार्टीचे ईश्वर मोरे तर रावेर लोकसभा मतदार संघातील भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार रक्षा खडसे, राष्ट्रीय आम जनसेवा पार्टीचे उमेदवार अजित तडवी, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार रोहिदास अडकमोल या सर्वांनी फेसबुकवर विनापरवानगी जाहिरात केल्याबद्दल त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.