परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे आवाहन
मुंबई : अपघातामध्ये महाराष्ट्र देशात दुर्दैवाने तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातील विशेषत: ग्रामीण भागात दुचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याबरोबर दुचाकींच्या अपघातांची आणि त्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. हेल्मेटचा वापर, चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्टचा वापर यासारख्या छोट्या उपाय योजनांचा अवलंब केला तरी अपघातातील मोठी जिवीतहानी टाळता येऊ शकेल. त्यासाठी सर्वांनी संवेदनशीलतेने आणि सजगपणे वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन परिवहन मंत्री तथा राज्य रस्ता सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी येथे केले. परिवहन विभागामार्फत राज्यात नुकताच रस्ते सुरक्षा पंधरवडा राबविण्यात आला. मुंबईत या पंधरवड्याचा सांगता समारंभ झाला, त्यावेळी मंत्री रावते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) आर. के. पद्मनाभन, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार, वेस्टर्न इंडीया ऑटोमोबाईल असोसिएशनचे नितीन डोसा आदी उपस्थित होते.
सिटबेल्ट लावला म्हणून जीव वाचला
रस्ते अपघाताविषयी आपला एक अनुभव सांगताना मंत्री रावते म्हणाले, वाहतुकीचे नियम पाळल्यास त्यातून प्राणाचे रक्षण कसे होऊ शकतो याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. काही वर्षापूर्वी मुंबईतून प्रवास करीत असताना माझ्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पण मी स्वत: तसेच वाहन चालकाने सीटबेल्ट लावलेला असल्याने आम्हा दोघांनाही कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. सीटबेल्ट लावला नसता तर आज परिस्थिती वेगळी असू शकली असती. फक्त सीटबेल्ट लावलेला असल्याने त्या अपघातात आपले प्राण वाचले, असे त्यांनी सांगितले. मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे हा मृत्यूचा सापळा बनला आहे. या महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाय योजना करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाची बांधणी करताना रस्ते सुरक्षेच्या सर्व उपाय योजनांची अंमलबजावणी करण्याची सूचना आपण केली असल्याची माहितीही मंत्री श्री. रावते यांनी यावेळी दिली.
वाहने २ टक्के, अपघात मात्र १० टक्के
परिवहन विभागाचे प्रधान सचिव सौनिक यावेळी म्हणाले, देशभरात रस्ते अपघातात दरवर्षी सव्वा ते दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. देशाच्या मनुष्यबळाची ही फार मोठी हानी आहे. आपल्या देशात जगातील फक्त २ टक्के वाहने आहेत. पण जगातील १० टक्के रस्ते अपघात आपल्या देशात होतात. हे कोणत्याही परिस्थितीत रोखणे आवश्यक असून यासाठी वाहन चालकांनी रस्ते नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.