कॅश व्हॅनच्या कर्मचार्‍यावर वार करून रोकड पळविली 

0
 पिंपरी-चिंचवड : एलआयसी ऑफीसमध्ये पैसे घेण्यासाठी आलेल्या कॅश व्हॅनच्या कर्मचार्‍यावर वार करून भरदिवसा चोरट्यांनी 48 लाखांची रोकड असलेली बॅग पळविली. ही घटना गुरुवारी (दि.3) दुपारी एकच्या सुमारास निगडीतील यमुनागरमध्ये घडली. या व्हॅनमध्ये एलआयसी ऑफीससह आणखी बँकाचीही रोकड असल्याची माहिती पुढे आली आहे. महेश पाटणे (रा. हडपसर) असे जखमीचे नाव आहे. ही सारी घटना सीसी टीव्ही कॅमेर्‍यात टिपली गेली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, यमुनानगर येथील एलआयसी ऑफीसमध्ये पैसे घेण्यासाठी (एमएच 02 एक्सए 4699) व्हॅन आली होती. पैशाची बॅग व्हॅनमध्ये ठेवत असताना कशी व्हॅन कर्मचार्‍यावर तेथे आलेल्या चौघांनी वार केले. त्याला जखमी करून पैशांची बॅग हिसकावून पळवून नेली. या घटनेत कॅशव्हॅन कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.
यमुनानगर एलआयसी ऑफीसची 22 लाखांची, इतर बँकाची मिळून अंदाजे 48 लाखांची रोकड पळविली आहे. दरम्यान, एक अ‍ॅक्टिव्हा व पल्सर दुचाकीवरून आलेल्या चार चोरट्यांनी ही बॅग पळविली असल्याचे सीसी टीव्ही कॅमेर्‍याने टिपलेल्या दृश्यात दिसत आहे. निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.