नवी दिल्ली- सीबीआय लाचखोरी प्रकरणी केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) न्यायालयाला सीलबंद अहवाल सोपवला आहे. सीबीआयनेही आपला सीलबंद अहवाल सादर केला आहे. सीव्हीसी आणि सीबीआय दोन्ही संस्थांनी दिलेला अहवाल वाचनासाठी न्यायालयाने पुढील सुनावणी १६ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे ही सुनावणी शुक्रवारी होणार आहे.
न्यायालयाने सीबीआयच्या वकिलांना अहवालातील माहिती विचारली. सीबीआयने हंगामी संचालक नागेश्वर राव यांच्या निर्णयांवरही अहवाल सादर केला आहे.
या प्रकरणातील सर्व पैलूंचा दोन आठवड्याच्या आत सखोल तपास करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सीव्हीसीला अहवाल सादर केल्यानंतर दिले. नियमांची पायमल्ली करत आपल्याला सुटीवर पाठवण्यात आल्याचा आरोप सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी केला आहे. त्याचबरोबर हंगामी संचालकांनी अधिकार क्षेत्रात नसलेले काही व्यक्तिगत निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्या प्रकरणी आज सुनावणी होती.