नवी दिल्ली-सीबीआयमधील वादंगामुळे केंद्र सरकारकडून क्रमांक एकचे अधिकारी संचालक अलोक वर्मा आणि क्रमांक दोनचे अधिकारी उपसंचालक राकेश अस्थाना यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर आता संघटनेतील इतरही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे अस्थाना यांच्यावरील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करणारे उपाधीक्षक ए. के. बस्सी यांची थेट पोर्टब्लेअरला बदली करण्यात आली आहे.
अतिरिक्त अधीक्षक एस. एस. गुम यांची बदली जबलपूरला करण्यात आली आहे. इतकेच नव्हे सीबीआयचे उपमहानिरीक्षक मनिष कुमार सिन्हा, तरुण गौबा, जसबीर सिंह, अनीस प्रसाद, के. आर. चौरासिया, एचओबी राम गोपाल आणि पोलीस अधीक्षक सतीश डागर यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यातील अनेक अधिकारी उपसंचालक राकेश अस्थाना यांच्याविरोधातील प्रकरणाची चौकशी करीत होते.
सीबीआयचे जेडीपी अरुणकुमार शर्मा, ए. साई मनोहर, एचओव्ही वी. मुरुगुशन, डीआयजी अमितकुमार यांची तत्काळ नव्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सीबीआयच्या कार्यालयाला सील केल्याच्या वृत्तावर सीबीआयच्या प्रवक्त्यांनी अशा प्रकारे कुठलीही खोली सील करण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.
सीबीआयचे उपसंचालक राकेश अस्थाना यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी डीआयजी तरुण गोबा, एसपी सतीश डागर आणि सहसंचालक व्ही. मुरुगुशन करणार आहेत. यासंदर्भात सीबीआयच्या मुख्यालयात प्रभारी संचालक एम. नागेश्वर राव यांनी महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे.