नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यावेळी त्यांनी आपण राजकारणातून निवृत्ती घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याआधी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीदेखील आपण लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचा निर्णय जाहीर केला होता. उमा भारती यांनी निवडणुकीकडे लक्ष देण्याऐवजी पुढील दीड वर्ष आपण सर्व लक्ष अयोध्येतील राम मंदिर आणि गंगा नदीच्या स्वच्छतेकडे देणार असल्याचे म्हटले आहे.
उमा भारती यांनी गंगा नदीच्या किनारी २५०० किमी पदयात्रा काढणार असल्याची घोषणा केली. जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीला ही यात्रा सुरु होईल, जी पुढील दीड वर्ष सुरु असेल असे त्यांनी सांगितले.
मी अखेरच्या श्वासापर्यंत राजकारणाशी संबंधित असेन. कोणीही मला राजकारणातून बाहेर पडण्यासाठी जबरदस्ती करु शकत नाही. भाजपात राहूनच मी राजकारण करेन. पण दीड वर्षासाठी मला गंगा नदी हवी आहे, असे उमा भारती बोलल्या आहेत.