पहिल्याच दिवशी भुजबळ कडाडले!

0
पुरवणी मागण्यांवर बोलताना वनमंत्र्यासोबत तूतू मैं मैं
निलेश झालटे, नागपूर – बऱ्याच कालावधीनंतर विधानभवनात दाखल झालेल्या आणि सभागृहात आलेल्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवर चांगलाच आसूड ओढला. अडीच वर्षाच्या काळानंतर पहिल्यांदाच विधानसभेत आलेले भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यावेळी वनविभागाच्या बाबीवर बोलत असताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भुजबळ यांच्यामध्ये चांगलीच तू तू मैं मैं झाली. अखेर सर्व सदस्यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले.
पुरवणी मागण्यांवर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, राज्यातील अनेक गावांमध्ये वीज नाही. वीज गावागावात पोचवू असे आश्वासन सरकारने दिले. तर दुसरीकडे रिलायन्स एनर्जी कंपनीने दोन हजार कोटी रुपये कर थकवला आहे. दोन वर्षात एक रुपयाही दिला नाही. तरीही त्यांच्यावर कारवाई नाही. तरीही ते कंपनी विकायला निघाले आहेत. शेवटी हे जनतेचे पैसे आहेत. त्यामुळे पाच लाख काय किंवा दहा लाख काय हे सरकार कर्ज होईपर्यंत वाट बघणार आहे का? सर्वसामान्यांकडून वीजबीले वसुल केले जातात परंतु या धनदांडग्याकडून वसूल केले जात नाही. त्यांच्याकडून वसूल करण्याची हिमंत राज्यातील नेत्यांकडे नाही, असा टोला आमदार छगन भुजबळ यांनी लगावला.
अर्थमंत्री मुनगंटीवार भुजबळ यांच्या रडारवर!
भुजबळ यांनी विधानसभेत पाऊल टाकल्यावर ते कोणावर कडाडणार याबाबत उत्सुकता होती. मात्र त्यांच्या आजच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे चांगलेच घायाळ झाले. या सरकारने लोकांची फसवणूक केली, यांनी चार वर्षात काय दिवे लावले ते मला माहीतेय. सरकराने राज्यची आथिक स्थिती बिघडवली असल्याचा आरोप केला. याशिवाय राज्यातील जनतेला यांनी अनेक आश्वासन दिले. राज्याला खड्डेमुक्त करणार टोलमुक्त करणार असे आश्वासन दिले त्याचे काय झाले ? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
नाशिक जिल्ह्यात झाडे लावण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगत जिल्हाधिकारी जमिनीचे पट्टे तयार करण्यास वेळ नसल्याचे सांगतात. तसेच प्रत्येक खाजगी जमिनीवरही जावून झाडे लावतात. या आरोपावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हरकत घेत अशी कामे काय वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून केली जातात काय ? असा सवाल करत जमिनीचे पट्टे तयार करण्याचे काम महसूल विभागाचे असल्याची बाब भुजबळ यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर भुजबळ यांनी तुम्हाला काय बोलायचे ते माझे झाल्यावर बोला पण आधी माझे बोलणे पूर्ण होवू द्या अशी विनंती केली. तरीही मुनगंटीवार यांनी मी काहीही ऐकून घेणार नसल्याचे सभागृहातच मोठ्याने जाहीर केले.
 यानंतर भुजबळ यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेची घडी बिघडवून टाकल्याचा आरोप केला. भुजबळ यांच्या या आरोपावर मुनगंटीवार यांनी चिडून आमचे सगळे कामकाज पारदर्शी आहे. तुमच्यासारखे लपण्यासारखे नसल्याचे सांगत भुजबळांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भुजबळ यांना उद्देशून मुनगंटीवार यांचा तोल देखील सुटला. मुनगंटीवारांचा संताप पाहून सत्ताधारी बाकावरील सर्वच सदस्य त्यांना शांत करण्यासाठी त्यांच्याजवळ धावले आणि भुजबळ-मुनगंटीवार यांच्यात रंगलेली खडाजंगी थांबली.
चंद्रकांत पाटलांनाही टोला
२०१८ पर्यंत खड्डेमुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचे आश्वासन दिले. तसेच राज्यातील सर्व रस्ते टोल मुक्त करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी जाहीर केला. मात्र त्यावर काहीही केले नसल्याचा आरोप मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ साहेब तुम्ही मुद्यावर बोला अशी विनंती केली.भुजबळ आणि पाटील यांच्यातील या संभाषणावर पुन्हा वाद निर्माण होवू नये या उद्देशाने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हस्तक्षेप करत भुजबळ साहेब तुम्हाला बाब भाषण करता येत नाही. तुम्ही मंत्री राहीलात. मात्र आजही तुम्हाला भाषण करता येत नसल्याची सूचना करत योग्य भाषण करण्याची भुजबळांना सूचना केली.