शिवरायांच्या वैभवाच्या पाऊलखुणा जतन करण्यासाठी प्रयत्न

0

चाळीसगावचे उद्योजक मंगेश चव्हाण यांचे प्रतिपादन

चाळीसगाव – छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकिल्यासाठी निवडलेल्या जागा, त्यांची रचना, बांधकाम आदींचा फायदा त्याकाळी स्वराज्य निर्माणात झाला. मात्र दुर्दैवाने आपण या ऐतिहासिक वारस्याचे जतन करण्यात कमी पडलो की काय असं गडकिल्यांची अवस्था बघून वाटत. या पवित्र कार्यात शिवरायांचा मावळा म्हणून खारीचा वाटा उचलताना मला खूप अभिमान वाटत आहे. यापुढेही सहयाद्री प्रतिष्ठाणच्या कार्यात तन-मन-धनाने सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवाच्या पाऊलखुणा जपण्यासाठी माझे अंतःकरणपूर्वक प्रयत्न सुरूच राहतील असे प्रतिपादन चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते उद्योजक मंगेश चव्हाण यांनी केले. ते सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या किल्ले पदमदुर्ग (मुरुड, जिल्हा रायगड) येथील तोफगाडा दुर्गार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
चाळीसगाव येथील मंगेश चव्हाण यांच्या दातृत्वातून व अजय जोशी यांच्या हातून तयार झालेल्या दोन तोफगाडाचे दुर्गार्पण किल्ले पदमदुर्ग येथे करण्यात आले. यावेळी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत सरदार जोत्याजीची भुमिका साकारणारे गणेश लोणारे, शिवशंभु महानाट्याचे लेखक-दिग्दर्शक राजे महाडिक, मुरूडच्या नगराध्यक्षा पाटील, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमीक गोजमगुंडे, मजा अध्यक्ष गणेश रघुवीर, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दिलीप घोरपडे चाळीसगाव, संपर्क प्रमुख प्रकाश नायर चे तालुकाध्यक्ष हेमंत भोईटे अजय जोशी, गजानन मोरे, संभाजी पाटील, दिगंबर शिर्के, हर्षवर्धन साळुंखे तसेच सह्याद्री प्रतिष्ठानच्या विविध विभागातील असंख्य कार्यकर्ते दुर्गसेवक उपस्थित होते.

किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासनाकडे पाठपुरावा – मंगेश चव्हाण
राजस्थान मध्ये गडकिल्याचे जतन करून पर्यटनाच्या दृष्टीने त्याचा विकास केला गेला. त्यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील झाली. महाराष्ट्रात मोजकेच गडकिल्ले सोडले तर पदमदुर्ग सारखे शेकडो गडकिल्ले संवर्धनासाठी सहयाद्री प्रतिष्ठान सारख्या हातांची वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. या किल्ल्यांच्या विकासासाठी शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांचा मी स्वतः पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही उद्योजक मंगेश चव्हाण यांनी यावेळी दिली.

भंडारा उधळत तोफगाड्यांचे लोकार्पण
छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय गड किल्ले वाचवा महाराष्ट्र वाचवा या घोषणा देत भंडारा उधळीत या तोफा गाड्यांचे लोकार्पण मोठ्या उत्साहात केले गेले. मंगेश चव्हाण यांच्या या दातृत्वामुळे इथून पुढे या गाड्यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक जातील आणि पद्मदुर्ग वरील पर्यटन वाढण्यास निश्चितच मदत होईल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

पद्मदुर्गचा इतिहास
पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेला मध्ययुगीन जलदुर्ग आहे. मराठा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला मुरूड गावाजवळील समुद्रात आहे. मुरूड रायगड जिल्ह्यामधील तालुक्याचे गाव आहे. मुरूडजवळ जंजिरा व सामराजगड असे इतर किल्ले आहेत. जवळ असलेल्या जंजिरा किल्ल्याच्या सहाय्याने सिद्दी अतिशय प्रबळ झाले. त्यांच्या आरमारी सामर्थ्याने त्यांनी किनारपट्टीवर दरारा निर्माण केला. सिद्द्यांच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी शिवाजीराजांनी मुरूडच्या समुद्रातल्या कासवाच्या आकाराच्या बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा जलदुर्ग बांधला. त्याबद्दल महाराजांनी उद्गार काढले, पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजापुरी उभी केली आहे. कासा किल्ल्यामुळे जंजिर्‍याच्या सिद्दीला चांगलाच पायबंद बसला.