भरधाव कारने महिलेला चिरडले

0

चाळीसगावच्या खरजई नाक्याजवळील घटना : मुलगा जखमी

चाळीसगाव- बकर्‍या चोरून कारमध्ये भरधाव वेगाने भडगावकडे जाणार्‍या चोरांनी रस्त्याच्या कडेला चालणार्‍या वृद्धेला जोरदार धडक दिली. त्यात त्या महिलेचा मृत्यु झाला. हा प्रकार कळता संतप्त नागरीकांनी कार अडवून त्यातील तरुणांना चांगलाच चोप दिला. तसेच कारची तोडफोडही केली. या झटापटीत कारमधील दोन चोर पळून गेले तर एक चोर लोकांच्या हाती लागला. त्याला शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून कारमधील आठ बकर्‍यांची सुटका करण्यात आली आहे. यातील अटक करण्यात आलेला चोरटा सलीम करीम खाँन ( पंचवटी नाशिक) याला जमावाने ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
या घटनेची माहिती अशी की, आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास एक पांढरी कार हॉटेल दयानंदकडून खरजई नाकाकडे भरधाव वेगाने जात होती. तर खरजई नाका परिसरात रहिवासी असलेल्या बेबीबाई पंढरीनाथ चौधरी (वय ६५)ह्या मुलगा बालुभाऊ चौधरी सोबत दुचाकीवरून दवाखान्यात जात असतांना या भरधाव वेगाने जात असलेल्या पांढर्‍या कारने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात बेबीबाई चौधरी यांचा कारखाली आल्याने जागीच मृत्यु झाला. हा प्रकार समजताच संतप्त नागरीकांनी धाव घेत कारचा पाठलाग करून पकडले व त्यातील तरुणांना बाहेर काढून चांगलाच चोप दिला. या झटापटीत कारमधील तिघांपैकी २ जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. तर एकास नागरीकांनी पकडून शहर पोलीसांच्या ताब्यात दिले. या कारमध्ये ८ बकर्‍या होत्या, असे नागरीकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे तरुण बकरीचोर असल्याचे समोर आले आहे. हे चोर नाशिककडचे असल्याचे बोलले जाते. बकर्‍या चोरून पकडले जावू नये म्हणून ते भरधाव वेगाने कारमधून जात असतांना खरजई नाक्याजवळ त्यांनी समोरून येणार्‍या मोटारसायकलला धडक दिली. त्यात वृद्धेचा मृत्यु झाला. या घटनेने खरजई नाका परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला कलम ३०४ अं,२७९,३३७,३३८,४२७, मोटार वाहन कायदा १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील करीत आहेत.