एकाच रात्रीत सात ते आठ दुकाने फोडण्याचा प्रयत्न
चाळीसगाव- चाळीसगाव शहरात चड्डी बनियान गँगने चांगलाच धुमाकूळ घातला असुन एकाच रात्रीत भडगाव रस्त्यावरील घाटे संकुलातील सात ते आठ दुकाने शटर उचकावून फोडून मोठी लुटमार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे व्यापार्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. याप्रकरणी शहर पोलीसात दुपारपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता.
या घटनेची माहिती अशी की, येथील भडगाव रोडवरील घाटे संकुलामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापारी गाळेधारक आहेत. रात्री व्यापार्यांनी आपापली दुकाने बंद केल्यानंतर ते घरी गेले. आज सकाळी हे व्यापारी पुन्हा दुकाने उघडण्यासाठी आले असता तब्बल सात ते आठ दुकानांचे कुलूप तोडून शटर उचकावून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. या व्यापार्यांनी दुकाने न उघडताच शहर पोलीस स्टेशन गाठून पोलीसांना याबाबतची माहिती दिली. घटनास्थळी पोलीस अधिकारी आल्यावरच व्यापार्यांनी आपापली दुकाने उघडली. सहा ते सात दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. या दुकानांमधून नेमका किती रूपयांचा ऐवज चोरीस गेला हे समजून आले नाही. मात्र एका हॉटेलचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यात ठेवलेले १० ते १२ हजार रूपयांची रोकड लंपास केल्याचे कळते.
गल्ल्यातील १० ते १२ हजाराची रोकड लंपास
प्रत्यक्ष व्यापार्यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री ही चोरी झाली असावी असा अंदाज आहे. चोरट्यांनी विनोद कुमावत यांचे जत्रा बिअर शॉपी या दुकानाचे कुलूप तोडून शटर उचकावले, तर सचिन तिवारी यांच्या व्यंकटेश अल्युमिनीअम ग्लास या चार गाळ्यांचे शटर वाकविले. सागर वरखेडे यांच्या मालकीच्या हॉटेल वृंदावन या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतील गल्ल्यातील व बरणीतील सुमारे १० ते ११ हजार रूपयांची रोकड लंपास केली. मंगेश पाटे यांच्या बाप्पा मोबाईल हे दुकानही फोडण्याची प्रयत्न चोरट्यांनी केला. तर रविंद्र कुमावत यांच्या पप्पु पार्लर या दुकानाचे शटरचे कुलप तोडण्यात आले. या दुकानांमधून किती रूपयांचा ऐवज चोरीस गेला हे समजून आले नाही. अत्यंत वर्दळीच्या गजबजलेल्या भडगाव रस्त्यावर असलेल्या घाटे कॉम्पलेे्नसमध्ये एकाच वेळी अनेक दुकाने फोडण्याचा प्रयत्न झाल्याने व्यापार्यांमध्ये प्रचंड खळबळ उडून घबराट पसरली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांची गस्त वाढलेली असतांना देखील चोरट्यांनी हे धाडस केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
एकाच दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा तोही बंद
वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बहुताश व्यापार्यांनी दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमरे बसविले आहेत. घाटे संकुलामध्ये जी दुकाने फोडण्याचा प्रयत्न झाला त्यात एकाही दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. एका दुकानात सीसीटीव्ही कॅमरा आहे मात्र अनावधनाने तो कॅमेरा बंद आहे. शहरात मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावूनही चोरट्यांनी व्यापारी संकुलच लुटून नेण्याचा प्रयत्न केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.