चाळीसगावातील २ हजार वारकर्‍यांचे पंढरपूरकडे प्रस्थान

0

मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे वारीचे आयोजन : भाविकांसाठी ३० लक्झरी बसेस, ४० क्रुझर

चाळीसगाव- आषाढी एकादशी निमित्त श्री विठठल रखुमाईच्या दर्शनासाठी येथील दोन हजार भाविकांनी सोमवारी सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान केले. येथील युवा उद्योजक मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील भाविकांसाठी वारीचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने काढलेल्या पालखी मिरवणूक व ज्ञानोबा माउलीचा जयघोषाने शहर दुमदुमून गेले होते.
आषाढी एकादशी उत्सवानिमित्त तालुक्यातील भाविकांना विठ्ठल रखुमाईचे दर्शन घडावे, यासाठी मंगेश चव्हाण यांनी स्वखर्चातून पंढरपूर यात्रेचे आयोजन केले आहे. या निमित्ताने लक्ष्मीनगर भागातील पटांगणावर भक्ती पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामुळे चाळीसगावात वातावरण भक्तीमय झाले होते. यावेळी उद्योजक चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, दिनेश बोरसे, उपसभापती संजय भास्कर पाटील, देवयानी ठाकरे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, घृष्णेश्वर पाटील, बापु अहिरे, चंद्रकांत तायडे, महेंद्र मोरे, नगरसेविका संगीता गवळी, विजया पवार, तालुकाध्यक्ष के. बी. साळुंखे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष आनंद खरात आदी उपस्थित होते.

भगवंताच्या आज्ञेने वारी
यावेळी मंगेश चव्हाण म्हणाले की, आम्ही निमित्तमात्र असून भगवंतांच्या आज्ञेने ही वारी निघत आहे. भगवंताने आपल्याला ही प्रेरणा दिली. जीवनात यश अपयश पाहिले. त्यात आपल्या सार्‍यांच्या व आई-वडिलांचा आशीर्वाद कामी आला. आई-वडिलांसोबत तालुक्यातील दोन हजार आई-वडिलांना पंढरपूर नेण्याचे भाग्य मला मिळाल्याचे मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

माउलीचा जयघोष, शोभायात्रेने वेधले लक्ष
वारकरींना निरोप देतेवेळी सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. शोभायात्रेत टाळ, मृदंगांच्या गजरात जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषाने शहर दुमदुमून गेले होते. करगाव रोड, भडगावरोड, स्टेशन रोड मार्गे घाट रोड पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत हाती भगवे ध्वज घेऊन टाळ, मृदंगांचा नाद व फुगडी नृत्य करीत विठ्ठलाच्या भक्तीत दंग असलेले वारकरी व भक्तांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. तत्पूर्वी मंगेश चव्हाण यांनी सपत्नीक अश्व पूजन व पालखी पूजन केले. त्यानंतर ३० लक्झरी बसेस, ४० क्रुझर अशा वाहनांचा ताफा २ हजार वारकरी, भाविकांना घेऊन पंढरपूरकडे रवाना झाला.