महाश्रमदानासाठी सरसावले हजारो हात

0

अभोने तांडा, कुंझर तसेच बोरखेडा येथे श्रमदानाची दिवाळी : तृतीयपंथीयांचेही श्रमदान

चाळीसगाव – यंदाच्या पानी फाऊंडेशन आयोजित स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जामनेर,अमळनेर, पारोळा व चाळीसगांव अशा चार तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे या तालुक्यातील अधिकाधिक गावांनी यंदाच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.आज येथील आभोणे तांडा, कुंझर व बोरखेडा परिसरात भर उन्हाळ्यात आपले गाव पाणीदार करण्यासाठी महाश्रमदानाची दिवाळी गावकर्‍यांनी साजरी केली आहे. आमदार उन्मेष पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महाश्रमदानामध्ये सहभाग घेतला तसेच पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सत्यजित भटकळ व त्यांच्या सहकार्‍यांनी आज बोरखेडा येथे धावती भेट देऊन महाश्रमदान केले. गावे पाणीदार झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास गावकर्‍यांमध्ये दिसून आला आहे.

२२ तृतीयपंथी श्रमदानासाठी सरसावले
पाण्याचे दुर्भिक्ष्य आज समाजात सर्वात मोठी भेडसावणारी चिंता आहे. दुष्काळाशी करू दोन हात म्हणत अनेक सामाजिक संघटना पुढे येत आहेत. तालुक्यातील आभोणे या गावी पाणी फाउंडेशन अंतर्गत जलव्यवस्थापन करण्यात येवून श्रमदान करण्यात आले.जळगाव जिल्ह्यातील निरभ्र निर्भया फाऊंडेशनच्या तब्बल २२ तृतीयपंथीनीही या उपक्रमात सहभागी होत श्रमदान केले. त्यांच्या या श्रमदानाचे सर्वत्र कौतुक केले जात असून आम्हीही ही गावे पाणीदार करण्याचा संकल्प केला असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पाणी फाऊंडेशन आणि निरभ्र निर्भय फाऊंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमान्तर्गत चाळीसगाव तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या ‘आभोने’ या निर्जल तांड्यावर तृतीयपंथीय लोकांच्या हस्ते बंधारा बांधणी कामाचे उद्घाटन करण्यात आले. आभोने तांडयावरील लोकांनी सहभागी २२ तृतीयपंथीय लोकांचे आणि इतर सहभागी सदस्यांचे स्वागत केले. तसेच पाणी फाऊंडेशन टिम आणि निरभ्र निर्भय फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.मनीषा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जवळपास सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत तांड्यावरील लोकांनी पारंपरिक वेशभूषेत पारंपरिक गीते सादर करत खेळीमेळीच्या वातावरणात लोकसहभागातुन तसेच पाणी फाउंडेशन आणि निरभ्र निर्भय फाउंडेशन या दोन्ही टिमच्या कार्यकर्त्यांसोबत हा उपक्रम पार पडला.

एकजूटीने पेटले रान,तुफान आलया
तालुक्यातील अभोणे या गावाने वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला असून तालुक्यातील महिला संघटनांनी श्रमदानात हातभार लावत नवनिर्माणाचा चंग बांधला आहे.जयपाल हिरे, स्मिता बच्छाव, सुचित्रा पाटील यांनी मार्गदर्शन केले. युगंधरा फाउंडेशन व हिरकणी महिला मंडळाच्यावतीने तालुक्यातील अभोणे या गावी पाणी फाउंडेशन अंतर्गत जलव्यवस्थापन करण्यात येवून श्रमदान करण्यात आले. यावेळी युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव, हिरकणी महिला मंडळाच्या संस्थापिका सुचित्रा पाटील,सामाजिक कार्यकर्त्या प्रीती रघुवंशी, लता जाधव, विद्या कोतकर, योगिता राजपूत, उज्वला पाटील, छाया पाटील, अनिता शर्मा, वैशाली काकडे आदींनी सहभाग नोंदविला.

कुंझरमध्येही महिला सरसावल्या
कुंझर या गावाने वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला असून आज बचत गट महिला, वयवृध्द पुरुष-महिला, तरुण श्रमदानात हातभार लावुन गाव नवनिर्माणीचा जणु एक संदेश दिला आहे. महाराष्ट्रात पाणी ही मोठी समस्या असून पाण्याच्या दुर्भिक्षाने अनेक आयुष्यांची अक्षरशः वाताहत झाली आहे. आज सर्वत्र शेतकरी दुष्काळाला आणि उपासमारीला तोंड देत असून पाण्याच्या कमतरतेमुळे मानवनिर्मित संकट उद्भवले आहे. यास्तव पाणी फाउंडेशनच्या वतीने कुंझर गावात जलव्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

आमदारांनी केले श्रमदान
वाहून जाणारं पाणी अडवून जिरवणं त्याद्वारे भूगर्भपातळीत वाढ करणे तसेच पाणी वाहून गेल्यामुळे झालेला अपव्यय व बाष्पीभवनामुळे होणारे पाण्याचं नुकसान यामुळे टाळता येणार असल्याचे आमदार उन्मेश पाटील यांनी सांगितले. आणि स्वतः तीन तास थांबून श्रमदानात सहभाग घेतला.तर गेल्या २ वर्षापासून महाराष्ट्रात या चळवळीस सुरुवात झाली असून हा उपाय मोठ्या संख्येने जास्तीत जास्त गावांनी अवलंबिला असून यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत दिसुन येत आहे माजी पंचायत समितीचे सदस्य दिनेश बोरसे यांनी सांगितले.

वसुंधरा फाऊंडेशनची साहित्याची मदत
चाळीसगाव येथील वसुंधरा फाउंडेशनच्यावतीने कुंझर येथे श्रमदानासाठी ४० घमेले, २० पावडी, २० टिकम देण्यात आली. यावेळी कुंझर गावातील ५०० पेक्षा जास्त महिलांनी एकत्र येऊन श्रमदान करीत अनोखा संकल्प रुजविला.

बोरखेडा येथे सत्यजित भटकळ यांची धावती भेट.
राज्यातील पात्र २५०० गावांमधून ईश्वर चिठ्ठीच्या आधारे बोरखेडे गावाला एक लाख रुपयांचा निधी स्नेहालय संस्थेकडून मिळाला होता. त्यामुळे गावकर्‍यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. १६०० लोकसंख्या असलेल्या बोरखेडा गावांमध्ये आज महाश्रमदानाचा मोठा उत्सव साजरा करण्यात आला. बच्चे कंपनी पारंपरिक वेशभूषा व सांस्कृतिक कार्यक्रम करून सत्यजित भटकळ यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पातोंडा तसेच पंचक्रोशीतील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी श्रमदानासाठी कंबर कसली. पंचायत समितीच्या सभापती स्मितल बोरसे व माजी पंचायत समितीचे सदस्य दिनेश बोरसे यांच्यासह अनेक मान्यवर सपत्नीक महाश्रमदानसाठी एकत्र आले होते. सत्यजित भटकळ यांनी गावकर्‍यांना गाव पाणीदार होण्यासाठी पाणी फाउंडेशनने घेतलेल्या असलेल्या कामाचे व त्यांना प्रतिसाद देणारे गावकर्‍यांच्या माध्यमातून पाणीदार गावकर्‍यांचा इतिहास मांडला.