पाटणादेवी जंगलातील कन्हेर गडाची अवघड वाट झाली सुकर

0

सह्याद्री प्रतिष्ठानने ७० कोरीव पायर्‍या केल्या तयार

चाळीसगाव – येथून अठरा किलोमीटर असलेल्या पाटणादेवी अरण्यातील कन्हेरगडावर सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने गडावर जाण्यासाठी असलेल्या वाटेतील अत्यंत अवघड अशा उभ्या कातळ कड्यावर जवळपास ७० कोरीव पायर्‍या तयार करण्यात आल्या असून या पायर्‍यांचे पूजन नुकतेच करण्यात आले असून त्या पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. यामुळे कन्हेर गडावर जाणार्‍या हौशी पर्यटकांसाठी गडाची बिकट वाट अधिक सुकर झाली आहे.
या पायर्‍याचे पूजन कार्यक्रमात सर्व प्रथम पाटणा गावातून छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे चाळीसगाव सह्याद्री प्रतिष्ठानचे सर्व शिलेदार व सह्याद्री प्रतिष्ठानच्या राज्यभरातून आलेल्या विविध विभागांच्या शिलेदारांचा सहभाग होता. ही पालखी मिरवणूक पाटणादेवी अभयारण्यात शिरण्यापूर्वी असलेल्या गेट जवळील अभिजीत शितोळे यांच्या शेतात उभारलेल्या मंडपात नेऊन त्या ठिकाणी शाहीर वैभव घरात यांचा बहारदार पोवाड्यांचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी मान्यवरांचा सह्याद्री प्रतिष्ठानच्या विविध कामांची छायाचित्र चौकट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी चाळीसगाव नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष रमेश चव्हाण, युगंधरा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्मिता बच्छाव जिजाऊ जयंती समितीच्या अध्यक्षा सोनल साळुंखे, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाने पाटण्याचे माजी सरपंच अभिजीत शितोळे, सरपंच केशव पवार, विका सोसायटीचे चेअरमन हरिभाऊ घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

सुलभ वाट अनुभवली
सह्याद्रीच्या शिलेदारांनी कन्हेरगड चढाईस सुरुवात केली व रणरणत्या उन्हात सह्याद्री प्रतिष्ठानच्या महिला रणरागिणींच्या हस्ते या पायर्‍यांचे पुष्पहार श्रीफळ भंडारा उधळून भूमिपूजन करण्यात आले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा विजय असो’, ‘हर हर महादेव’, ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ अशा घोषणांनी संपूर्ण कन्हेरगडाचा आसमंत निनादला होता. पाटणा येथील कार्यक्रमात सूत्रसंचालन गजानन मोरे यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सह्याद्री प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दिलीप घोरपडे यांनी केले.