मेहुणबारे पुलाच्या कठडे दुरुस्तीला सापडला मुहूर्त

0

४९ वर्षे झालेल्या पुलाच्या डागडुजीला सुरवात

चाळीसगाव – येथील मेहूणबारे जवळील धुळे राष्ट्रीय महामार्गावरील गीरणा नदीवरील पुलाची गेल्या अनेक महिन्यांपासून दयनीय अवस्था झाली आहे.पुलाचे कठडे बर्याच ठिकाणी तुटलेले असल्याने हा पुल धोकादायक बनला होता. या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशामंधुन होत होती. आज अखेर या कामाला मुहूर्त गवसला असून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे.
मेहुणबारे येथील गिरणा नदीवर असलेल्या पुलावरून चालतांना भीती वाटावी इतकी दुरावस्था झाली होती. गिरणा नदीवर बांधण्यात आलेला हा पुल हा सन १९७० साली बांधण्यात आलेला होता. या पुलाला आज ४९ वर्ष झालेली आहेत. या पुलाची उंची नदिपात्रापासुन सुमारे तेरा मीटर उंच आहे. पुलाचे अँगल देखील खालून कमकुवत झाले आहेत. मध्यंतरी या पुलाच्या उघड्या पडलेल्या अँगलची थातूरमातूर डागडुजी करण्यात आली होती. हा पुल झाल्यापासुन ते आजपर्यंत कुठलीच दुरूस्ती झालेली नव्हती. दोन महिन्यावर असलेल्या पावसाळापुर्वी पुलाचे काम होणे गरजेचे आहे, अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली होती.

वाहनधारकांमध्ये होती नाराजी
चाळीसगाव धुळे महामार्ग हा नुकताच दुरूस्त करण्यात आला आहे.या दुरूस्तीच्या वेळी पुलाची दुरूस्ती करण्यात आलेली नव्हती त्यामुळे वाहन धारकांमधून नाराजी पसरली होती. गेल्या वर्षी या पुलावर भरधाव ट्रकने पुलाचा कठडे तोडुन खाली पडली होते. यात एकाचा मृत्यू झाला होता. काही दिवसांनी पुन्हा ट्रक कठड्यातच अडकल्याने तो सुदैवाने नदी पात्रात कोसळला नाही. तेव्हापासून पुलाचे कठडे तुटलेल्या अवस्थेत आहे. या पुलावरून दररोज हजारो वाहने जात असतात. दक्षिण भारतात जण्यासाठी हा सोयीचा मार्ग असल्याने अनेक अवजड वाहने या महामार्गावरून धावतात. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची नजर या पुलाकडे जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. पुलवरील कठड्यांच्या झालेल्या दुरावस्थेमुळे आणखी एखादा भिषण अपघात झाल्याशिवाय राहणार नाही अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. या पुलावरून चालतांना वाहन धारकांना अक्षरशा जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत होते. याबाबत धुळे येथील राष्ट्रीय प्राधिकरणाच्या सुत्रांनी देखील या पुलाच्या दुरुस्ती संदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच तो वरिष्ठांकडून पाठविण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडली होती. मात्र नुकताच कठड्याच्या दुरुस्तीला आता मुहूर्त मिळाला आहे.

जीर्ण पुलांचा प्रश्‍न ऐरणीवर
मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळील हिमालय पादचारी पुल कोसळून सहा जणांचा बळी गेल्याने पुन्हा राज्यातील जीर्ण पुलांचा प्रश्न एैरणीवर आला आहे. धुळे-चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११वरील मेहूणबारे जवळील गिरणा नदीवरील पुल अक्षरश: धोकेदायक बनला आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट कधी होणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पुलाची अवस्था धोकादायक असूनही दुरूस्तीचा मुहूर्तच सापडत नसल्याने मुंबईसारखी दुर्घटना घडल्यावर संबंधीत यंत्रणेला जाग येईल काय अशा संतप्त भावना व्यक्त केल्या जात होत्या. मात्र या डागडुजीेला सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.