जे.बी.एम. सोलर, मे. गो.रिन्युवेबल सोलर एनर्जी,फर्मी सोलर कंपनीकडून फसवणूक
जळगाव – शासकीय सोलर प्रकल्पाच्या नावाखाली शेतकर्यांची फसवणूक करून त्यांच्या जमिनी कवडीमोल भावात विकत घेणार्या कंपनीविरूध्दचा चौकशी अहवालास विलंब केल्याप्रकरणी चाळीसगाव तालुक्यातील शेतकर्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयसमोर धरणे आंदोलन केले. दरम्यान दि. २७ जूनपर्यंत चौकशी अहवाल सादर न केल्यास शेतकरी विधानभवनासमोर तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील मौजे बोढरे, शिवापुर, पिंपरखेड, येथील सोलर पिडीत शेतकर्यांनी केलेल्या तक्रारींचा चौकशी अहवाल दि. १५ फेबु्रवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्याचे आदेश होते. मात्र अद्यापपर्यंत हा अहवाल सादर करण्यात आलेला नाही. जे.बी.एम. सोलर, मे. गो.रिन्युवेबल सोलर एनर्जी,फर्मी सोलर या कंपन्यांनी गैरमार्गाने फसवणूक करून बेकायदेशीररित्या १२०० एकर जमीन शासकीय प्रकल्पाच्या नावाखाली शेतकर्यांकडुन अत्यंत कवडीमोल भावात घेतल्या. तेव्हापासून पिडीत शेतकरी न्याय मिळवण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. जमीनी खरेदी करण्यापुर्वी कंपन्यांनी याठिकाणी सरकारी सौर ऊर्जा प्रकल्प येत असुन भुसंपादन नियमानुसार बाजार भावाच्या पाच पट मोबदला व कुटूंबातील एका व्यक्तीस नोकरी दिली जाईल असे खोटे सांगून रजिष्टर सौदा पावतीच्या नावाखाली थेट जमिनी कंपनीच्या नावे करून घेतल्या.
दोन वर्षापासून संघर्ष
चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी गेल्या दोन वर्षापासून संघर्ष करीत आहे. या शेतकर्यांनी महसुल मंत्र्यांकडे तक्रारी केल्यानंतर राज्यमंत्र्याकडे दोन वेळा बैठका झाल्या. त्यात सखोल चौकशी अंती या सोलर कंपन्यांचा कारभार बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यानुसार मंत्र्यांनी फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकार्यांमार्फत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र हा अहवाल शासनाकडे पाठविण्यास विलंब केला जात आहे. तरी दि. २७ जूनपर्यंत हा अहवाल सादर न झाल्यास सर्व सोलर प्रकल्प पिडीत शेतकरी विधानभवनावर तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात अध्यक्ष अॅड. भरत चव्हाण, कार्याध्यक्ष किशोर सोनवणे, उपाध्यक्ष धनंजय देशमुख, सचिव भिमराव जाधव यांच्यासह पिडीत शेतकरी सहभागी झाले होते.