काश्मीरात दहशतवाद हल्ला होण्याची शक्यता? सुरक्षा वाढवली

0

श्रीनगर: काही दिवसांअगोदर काश्मीर मध्ये झालेल्या चकमकीत झाकीर मुसा या दहशतवाद्याला ठार मारण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले होते. त्याचा बदला घेण्यासाठी काश्मीर मध्ये पुन्हा एकदा पुलवामा सारखा हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या हल्याची माहिती मिळाल्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकांनी हवाई मार्गावर लक्ष ठेवले आहे.

या हल्ल्याची माहिती पाकिस्तान ने भारत आणि अमेरिकेला दिली आहे. हि माहिती मिळताच भारतातल्या सुरक्षा रक्षकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण काश्मीरमध्ये हा हल्ला होऊ शकतो, असे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानने भारताला दहशतवादी हल्ल्याची माहिती सांगणे म्हणजे भारताच्या विरोधात आणि दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढवणे हाच त्यांचा उद्देश आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

बिश्केकमधील शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदे आधी पाकिस्तानकडून ही माहिती देण्यात आल्याने पाकिस्तानच्या माहितीवर संशयाला पुरेशी जागा आहे, असेही सूत्रांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एससीओच्या बैठकीत सहभागी झाले. या ठिकाणी मोदी यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. दहशतवादाविरोध लढण्यासाठी सर्व देशांनी एकत्र यायला हवे, असे मोदींनी यावेळी म्हटले होते.