अमरावती: ‘चलो आत्मकुरू’ रॅलीचे आयोजन करणारे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे पुत्र लोकेश यांना आंध्र प्रदेश पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरी नजरकैदेत ठेवले आहे. ‘चलो आत्मकुरू’ रॅलीचे आज बुधवारी गुंटूरमधील पलनाडू येथे आयोजन करण्यात आले होते. सरकारने या रॅलीला परवानगी नाकारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चंद्राबाबू यांनी सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ उपोषणाचे हत्यार उपसण्याची घोषणा करणाऱ्या चंद्राबाबूंना सरकारने नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय घेतला.
वायएसआरसीपी सरकार राजकीय हिंसाचार करत असल्याचे सांगत या हिंसाचाराविरोधात आपली रॅली असल्याचे चंद्राबाबू यांनी जाहीर केले होते. मात्र आंध्र प्रदेश पोलिसांनी या रॅलीला परवानगी नाकारत नरसरावपेटा, सत्तेनापल्ले, पलनाडू आणि गुराजलामध्ये कलम १४४ लागू करत जमावबंदी लागू केली. पोलिसांनी राज्यातील अनेक तेलुगू देसम पक्षाच्या नेत्यांनाही नजरकैदेत टाकले आहे.
चंद्राबाबू नायडू हे आज सकाळी ९ वाजता आत्मकुरूसाठी घराबाहेर निघणार होते. मात्र त्यांना रोखण्यात आले. यानंतर त्यांनी आपल्या घरीच उपोषण सुरू करण्याची घोषणा केली. शिवाय पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही उपोषण करण्याच्या सूचना केल्या. यानंतर पोलिसांनी त्यांचे पुत्र लोकेश यांनाही नजरकैदेत टाकले. तेलुगू देसम पक्षाच्या नेत्यांबरोबरच वायएसआरपीसीच्या नेत्यांनाही पोलिसांनी नजरकैदेत टाकले आहे. तेलुगू देसम पक्षाला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनीही हालचाली करू नयेत यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.