वरणगावच्या मुख्याधिकार्यांविरूध्द चंद्रशेखर अत्तरदेंचा ‘एल्गार’
पालिका हद्दीतील रहिवास प्रयोजनार्थ क्षेत्रात विकासकामांना आडकाठी
जळगाव, प्रतिनिधी – वरणगाव पालिकेचे मुख्याधिकारी समिर शेख यांच्या विरूध्द भाजपाच्या जळगाव ग्रामिण मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे, योगेश सोनार आणि उल्हास बोरोले यांनी एल्गार पुकारला आहे. मुख्याधिकारी शेख जातीवाद करीत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी करीत उपोषण व आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, वरणगाव पालिका हद्दीतील गट नंबर 50 मधील रहिवास क्षेत्रात रस्ते, गटारी करून हे क्षेत्र विकासीत करण्यासाठी चंद्रशेखर अत्तरदे, योगेश सोनार, उल्हास बोरोले यांनी परवानगी मागितली होती. 5 जानेवारी रोजी नगररचनाच्या सहाय्यक संचालकांनी त्यांना तात्पूर्ती परवानगी दिली. नगररचना विभागाच्या परवानगी वरणगाव पालिकेचे मुख्याधिकारी समीर शेख यांनी विकास कामे करण्यासाठी पत्र देणे अपेक्षीत होते. मात्र, या क्षेत्रात रस्ता नसल्याचे कारण पुढे करून विकासकामे करण्यास परवानगी मिळणार नाही असा पवित्रा मुख्याधिकारी श्री.शेख यांनी घेतला. मात्र, टिपी शिटमध्ये या गटात वापर करण्या योग्य रस्ता दिसून येत असल्याचा दावा चंद्रशेखर अत्तरदे यांनी केला आहे.
मुख्याधिकारी समिर शेख वैयक्तीक व्देशापोटी मुद्दाम परवानगी देत नाही. या जागेत रस्त्यालगतच लेवा समाजाची कुलदेवी मातेचे मंदिर आहे. हे मंदिर आमच्यासह सर्वच भक्तांच्या आस्थेचे ठिकाण आहे. हेच मंदिर मुख्याधिकारी समिर शेख यांना खटकत असून कुलदेवीचे मंदिर हटविण्यासाठीच ते अडवणूक करीत असल्याचा दावा चंद्रशेखर अत्तरदे यांच्यासह तिघांनी केला.
जातीयवादी वागणूकीतून मुख्याधिकारी समीर शेख धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून जातीयवादाला खतपाणी घालणार्या मुख्याधिकारी सलिम शेख यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मुख्याधिकार्यांवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसू प्रसंगी आत्मदहन करू असा इशारा चंद्रशेखर अत्तरदे, योगेश सोनार आणि उल्हास बोरोले यांनी एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी यांच्यासह डिपीओ यांना दिले आहे.