उत्तराखंडमधील चारधाम यात्रा बर्फवृष्टीने थांबली!

0

देहराडून । निसर्गाचा कहर अजूनही थांबायचे नाव घेत नाही. खराब हवामान आणि बर्फवृष्टीमुळे मंगळवारी उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा तात्पुरती थांबण्यात आली आहे. केदारनाथ आणि बद्रीनाथमध्ये शेकडो भाविक अडकलेले आहेत. एका व्यक्तीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. केदारनाथ धाममध्ये सोमवारपासून हिमवृष्टी होत आहे. याठिकाणी रस्त्यावर 2 ते 3 इंच बर्फ साचलेला आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्यासह सुमारे 6 काँग्रेस नेतेही भाविकांबरोबर अडकलेले आहेत.

त्यांच्यासाठी हेलीकॉप्टरही उतरवता येत नाही
रुद्रप्रयागचे जिल्हाधिकारी मंगेश घिलडियाल यांनी सांगितले की, खराब हवामानामुळे केदारनाथ यात्रेवर गेलेल्या शेकडो भाविकांना रस्त्यातच अडवण्यात आले आहे. यात रावत, राज्यसभेचे खासदार प्रदीप टम्टा आणि स्थानिक आमदार मनोज रावत यांच्यासह 6 काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेस नेत्यांना परत आणण्यासाठी हेलिकॉप्टरही उतरवणे शक्य नाही.

कामाची पाहणी करण्यासाठी गेल्याने अडकले
हरीश रावत यांनी रविवारी काँग्रेस नेते आणि समर्थकांसह केदारनाथ यात्रा सुरू केली होती. याठिकाणी भगवान शिव शंकराच्या दर्शनाबरोबरच केदारपुरीमधील विकासकामांबाबत भाजपने केलेल्या दाव्यांची शहानिशा करणे हाही त्यांचा उद्देश होता.