नवी दिल्ली: आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय तपास विभाग (सीबीआय)ने आज शुक्रवारी दिल्लीच्या कोर्टात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्र माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासह त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम, पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्यासह १४ जणांच्या नावाचा यात समावेश आहे. येत्या सोमवारी, २१ ऑक्टोबर रोजी यावर सुनावणी होणार आहे.
पी. चिदंबरम याच प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असून त्यांची रवानगी दिल्लीच्या तिहार तुरुंगात करण्यात आली आहे. गुरुवारी कोर्टाने चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत २४ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली होती. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देखील चिदंबरम यांना तुरुंगातच अटक करुन चौकशी केली होती. २१ ऑगस्ट रोजी त्यांना अटक झाल्यानंतर जवळपास दोन महिने ते सीबीआय आणि न्यायालयीन कोठडीत आहेत.
पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांची देखील या आरोपपत्रात नावे आहेत. माजी पती-पत्नी असलेले हे दोघे सध्या मुंबईच्या ऑर्थरोड आणि भायखाळा तुरुंगात आहेत. शीना बोरा हायप्रोफाईल हत्याकांड प्रकरणात सीबीआय कोर्टात त्यांच्यावर खटला सुरु आहे. आयएनएक्स मीडियाचे ते दोघेही संचालक होते. दोघांवर या कथीत भ्रष्टाचार प्रकरणाला मंजूरी दिल्याचा आरोप आहे.