नवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सुप्रीम कोर्टात माझ्याकडून निवडणुकीच्या आरोप-प्रत्यारोपातून ‘चौकीदार चोर है’ या शब्दाचा उल्लेख केला गेल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली. दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा ट्विट करत भाजपाला लक्ष केले आहे. ‘चौकीदार चोर है’च्या हॅशटॅगसोबत राहुल गांधी यांनी भाजपा आणि मोदी यांच्यावर टीका केली आहे. कमळछाप चौकीदार चोर असल्याचे २३ मे रोजी जनतेच्या न्यायालयात स्पष्ट होईल.
राहुल गांधी यांनी आज सुप्रीम कोर्टात ‘चौकीदार चोर है’साठी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्यांचे हे ट्विट आले आहे. सध्या हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. काही नेटीझन्सनी राहुल यांचे स्वागत केले आहे. तर काहींनी राहुल गांधीवर निशाना साधला आहे.
राफेल विमाने खरेदीप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकेसोबत संरक्षण मंत्रालयातून फुटलेली गोपनीय कागदपत्रे जोडण्यात आली आहेत. त्यामुळे फेरविचार याचिका फेटाळण्याची केंद्राची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून ही कागदपत्रे ग्राह्य धरली आहेत. त्यानंतर राहुल गांधी यांनी या प्रकरणी ‘चौकीदार चोर है’, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर विरोधकांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी झाली. आज सुप्रीम कोर्टात राफेल प्रकरणात फेरविचार याचिकेवर दिलेल्या निर्णयानंतर केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त केली. निवडणुकीच्या वातावरणात मी आवेशात विधान केले होते आणि विरोधकांनी माझ्या विधानाचा विपर्यास केला, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.