मुंबई- आयपीएल २०१८ मधील फायनल आज चेन्नई सुपरकिंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रात्री 7 वाजता वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दोन वेळाचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज संघ आता तिसऱ्यांदा आयपीएलचा किताब जिंकण्यासाठी उत्सुक आहे. त्याचबरोबर हैदराबादचा संघ किताब जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. हैदराबादला नमवूनच चेन्नईने यंदाच्या आयपीएलची फायनल गाठली. त्यामुळे आता पुन्हा हैदराबादला धूळ चारून किताबावर नाव कोरण्यासाठी चेन्नई संघ प्रयत्नशील राहणार आहे.
दोन वर्षांनंतर आयपीएलच्या व्यासपीठावर परतणारा चेन्नईचा संघ तिसऱ्या विजेतेपदासाठी उत्सुक आहे, तर २०१६ नंतर दुसरे जेतेपद पटकावण्याचे हैदराबादचे ध्येय आहे. पाच दिवसांपूर्वी हे दोन दक्षिणेतील संघ पात्रता-१ (क्वालिफायर-१) सामन्यात भिडले होते. त्या वेळी सलामीवीर फॅफ डू प्लेसिसने अखेपर्यंत जिद्दीने किल्ला लढवत चेन्नईला जिंकून दिले होते. चेन्नईने नऊ आयपीएलपैकी सात वेळा अंतिम फेरी गाठत आपले वर्चस्व दाखवले आहे.
चेन्नईच्या फलंदाजीची मदार शेन वॉटसन, सुरेश रैना आणि अंबाती रायुडू या त्यांच्या आघाडीच्या फळीवर आहे. डू प्लेसिस आणि ड्वेन ब्राव्हो महत्त्वाच्या क्षणी जबाबदारीने खेळतात. याशिवाय रवींद्र जडेजा, हरभजन सिंग आणि शार्दूल ठाकूर यांच्याकडे गोलंदाजीप्रमाणेच फटकेबाजी करण्याची क्षमता आहे.
हैदराबादने क्वालिफायर-२ च्या सामन्यात दोन वेळा विजेत्या कोलकाता नाइट रायडर्सचा १४ धावांनी पराभव करून अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवले. याचप्रमाणे चार पराभवांची मालिका हैदराबादने खंडित केली. याचबरोबर सनरायझर्सचा कर्णधार केन विल्यमन्सला कामगिरीत सातत्य राखण्याची आशा असेल. शिखर धवनवर संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी राहील. मनीष पांडे,अॅलेक्स हेल्स,युसूफ पठाण यांच्याकडे देखील चांगल्या फलंदाजाची जबाबदारी राहणार आहे. रशिदच्या साथीला भुवनेश्वर कुमार आणि सिद्धार्थ कौल या मध्यमगती गोलंदाजांची कुमक आहे.