पुणे :- छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज शुक्रवारी उच्च न्यायालयाने मंजूर केला. त्यांच्या जामीनाचे वृत्त समजताच अनेक ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. पुण्यातही आज (शनिवारी) राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षा रुपाली चाकणकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दगडुशेठ गणपतीची आरती करून आणि पेढे वाटून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी छगन भुजबळ 14 मार्च 2016 पासून मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहात आहेत. त्यांनी 2 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर गुरुवारी (3 एप्रिल) त्यांच्या जामीन अर्जावरील युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. शुक्रवारी न्यायालयाने भुजबळांना दिलासा देत त्यांचा जामीन मंजूर केला. यापूर्वी त्यांनी तब्बल 9 वेळा जामीनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते, मात्र त्यांना यश येत नव्हते.