मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. भेटीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात असलं तरी राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. जवळपास १५ मिनिटं दोघांनी चर्चा केली. यावेळी मिलिंद नार्वेकरदेखील उपस्थित होते. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत असंल तरी नेमकं काय कारण असावं याचे अंदाज बांधले जात आहे.
मंगळवारी सामना संपादकीयमध्ये उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका करत त्यांची बाजूही मांडली होती. यानंतर लगेचच ही भेट झाल्याने वेगवेगळे तर्क लढवले जात आहे. छगन भुजबळ आधी शिवसेनेत होते. मात्र नंतर त्यांनी शिवसेनेची साथ सोड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर शिवसेना आणि छगन भुजबळ यांच्यात नेहमी तणावाचे संबंध राहिले. त्यातच उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून बोलताना, भुजबळ शिवसेनेत असते तर अशाप्रकारे तुरुंगात सडण्याची वेळ आली नसती असे सूचक विधान केले होते.