छत्तीसगडमधील पहिल्यातील आज मतदान; सुरक्षा व्यवस्थेत वाढ

0

रायपूर- छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील १८ जागांसाठी आज मतदान होणार आहे. दंतेवाडा येथे शांततेत मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

मतदान सुरु होण्यापूर्वी सकाळच्या सुमारास नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दंतेवाडा येथील कटेकल्याण ब्लॉकमधील तुमाकपल कॅम्प येथे आयईडी (इम्प्रोव्हाईजड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस) स्फोट झाला. नक्षलवाद्यांनी २ किलो वजनाचा आयईडी येथे पेरला होता. पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास तुमाकपल-नयनार रस्त्यावर हा स्फोट झाला. सुरक्षा दल आणि मतदान अधिकारी सुरक्षित आहेत. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.

नक्षलवाद्यांनी रविवारी घडवलेल्या आयईडी स्फोटात सीमा सुरक्षा दलाचा जवान शहीद झाला, तर एक माओवाद्याचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले होते.

छत्तीसगढमध्ये पहिल्या टप्प्यात १० विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. तर राजनंदगाव येथील पाच मतदारसंघात आणि बस्तर येथील ३ मतदारसंघांमध्ये सकाळी ८ ते ५ यावेळेत नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात माहिती दिली आहे.

राज्यातील नक्षलप्रभावित विजापूर जिल्ह्यातील आलापल्ली येथे नक्षलवाद्यांनी २७ ऑक्टोबरला बुलेट प्रुफ बंकर सुरंगाने उडवले होते. या घटनेत सीआरपीएफच्या १६८ बटालियनचे ४ जवान शहीद झाले होते. तर २९ तारखेला नक्षलवाद्यांनी दंतेवाडा जिल्ह्यातील पालनार गावातील जिल्हा पंचायत सदस्य तसेच भाजपा नेते नंदलाल मुड्यामी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी ३० ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह दूरदर्शनच्या एक कॅमेरामनचाही मृत्यू झाला होता.