मुंबई : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांना श्वसनाचा त्रास होत जाणवू लागल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, अजित जोगी यांच्या छातीत संसर्ग झाल्यामुळे त्यांना त्रास होत होता. मात्र, आता त्यांची प्रकृती ठिक आहे. तसेच त्यांना आजच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर अजित जोगी मुंबईला उपचारांसाठी दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान अजित जोगी यांची तब्येत बिघडली होती. याआधी आजारी असल्यामुळे अजित जोगी यांना गेल्या मे महिन्यात रायपूरमधील रामकृष्ण केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना न्युमोनिया झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले होते.