मुंबई । माध्यम विश्वात खळबळ उडालेले जे. डे. हत्याप्रकरणाची अंतिम सुनावणी बुधवारी झाली. या प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्यासह विनोद असरानी, दीपक सिसोडीया, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, सतीश काल्या, अभिजीत शिंदे, अरुण डाके आणि मंगेश अगनावे या 9 जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर, पत्रकार जिग्ना वोराची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. तसेच, सिमकार्ड पुरवल्याचा आरोप असणार्या पॉल्सन जोसेफ याचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाने हा निर्णय दिला. यावेळी छोटा राजन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात उपस्थित होता.
छोटा राजन आणि दाऊद इब्राहिम यांच्यातील गँगवारच्या वादातून जे डे यांचा बळी गेला होता. हत्येमागील मुख्य सूत्रधार छोटा राजन याच्या इशार्यावरून डे याची हत्या करण्यात आली होती. पत्रकार जे. डे. यांच्यावर गोळ्या झाडणारा सतीश थंगप्पन जोसेफ ऊर्फ सतीश काल्या आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून या हत्याकांडासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या सहकार्य केलेल्या, सहभाग घेतलेल्या एकूण 12 आरोपींना अटक करण्यात आली होती. यात पत्रकार जिग्ना वोराचाही समावेश होता.
असे आहे प्रकरण…
11 जून 2011 रोजी मुंबईतील पवईमध्ये हिरानंदानी परिसरात ज्येष्ठ पत्रकार ज्योर्तिमय डे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ही हत्या छोटा राजन गँगमार्फत करण्यात आल्याचे समोर आले होते. तसेच, या हत्येत पत्रकार जिग्ना वोराचे देखील नाव होते. न्यायालयासमोर सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीवरून छोटा राजन पत्रकार जे. डे. यांच्या हत्येमागील मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले होते. तर, राजनच्या संभाषणात जिग्ना वोराचा उल्लेख होता.