नवी दिल्ली: आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेत, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) एका प्रकरणात एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर पी. चिदंबरम यांना हा जामीन मिळाला आहे. मात्र, असे असले तरी देखील चिदंबरम यांनी तुरुंगातच राहावे लागणार आहे. याचे कारण म्हणजे चिदंबरम हे २४ ऑक्टोबरपर्यंत सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत आहेत. आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआय आणि ईडीने वेगवेगळे खटले दाखल केले आहेत.
आयएनएक्स मीडिया प्रकरणी तुरुंगात असलेल्या पी. चिदंबरम यांच्या विरोधात इतर एखाद्या प्रकरणात अटक झाली नसल्यास त्यांची तुरुंगातून सुटका करता येऊ शकते असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. या बरोबरच त्यांनी १ लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलकाही भरणे गरजेचे आहे. मात्र, त्यांची तुरुगातून सुटका करण्यात आल्यानंतर त्यांना परदेशात जाण्याची परवानगी नसेल असेही कोर्टाने म्हटले आहे. शिवाय बोलावल्यानंतर वेळोवेळी त्यांना चौकशीसाठी हजरही राहावे लागणार आहे. पी. चिदंबरम २४ ऑक्टोबरपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत. सीबीआयने पी. चिदंबरम यांना २२ ऑगस्टच्या रात्री जोरबाग येथील निवासस्थानावरून अटक करण्यात आले होते.
दिल्ली हायकोर्टाने आयएनएक्स मीडियाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात पी. चिदंबरम यांना जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर चिदंबरम यांनी हायकोर्टाच्या या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. यावर १८ ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला. सध्या चिदंबरम २४ ऑक्टोबरपर्यंत ईडीच्या कोठडीत असून ते सीबीआयने दाखल केलेल्या एका प्रकरणातही २४ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत.