पठाणकोट: पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ-१६ विमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी आज सोमवारी एअर फोर्स प्रमुख बी.एस.धनोआ यांच्यासोबत पंजाबच्या पठाणकोट एअरबेसवरुन मिग-२१ विमानामधून उड्डाण केले. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी २७ फेब्रुवारीला पाकिस्तानी फायटर विमानांबरोबर झालेल्या डॉगफाइटमध्ये अभिनंदन यांचे मिग-२१ बायसन विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले होते. विमान कोसळण्याआधी अभिनंदन यांनी क्षेपणास्त्र डागून पाकचे एफ-१६ विमान पाडले. या कामगिरीबद्दल वर्थमान यांना वीर चक्र पुरस्काराने गौरवण्यात आले.
पठाणकोट हा आयएएफच्या २६ स्क्वाड्रनचा बेस आहे. इंडियन एअर फोर्सकडे रशियन बनावटीच्या मिग-२१ ची पाच स्क्वाड्रन आहेत. त्यातील चार स्क्वाड्रनही मिग-२१ बायसनने सुसज्ज आहेत. एअर फोर्स प्रमुख बी.एस.धनोआ सुद्धा फायटर पायलट आहे. १९९९ साली कारगिल युद्धाच्यावेळी त्यांनी मिग-२१ मधून हल्ला करुन पाकिस्तानची रसद तोडली होती.