पिंपरी-चिंचवडमधील नर्सिंग अभ्यासक्रमासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे!

पिंपरी । प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून वायसीएम रुग्णालयात सुरू करण्यात येणाऱ्या प्रस्तावित नर्सिंग अभ्यासक्रमाला राज्य शासनाच्य नगरविकास विभागाने मंजुरी द्यावी. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालण्यात आले आहे.

याबाबत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पत्र पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे नर्सिंग अभ्यासक्रमाची सुरूवात करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे प्रलंबित आहे. त्याला मान्यता मिळाल्यास, अभ्यासक्रम सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

महापालिका प्रशासनाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने २०१९ मध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यानंतर महाविद्यालयाचा अभ्यासक्रम सुरू झाला. प्रवेश प्रक्रियाही सुरू झाली आहे. नवीन वैद्यकीय महाविद्यालयामुळे रुग्णालयात दरवर्षी सरासरी १४० ते १५० पूर्णवेळ तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाले आहेत. या सोबतच नर्सिंग स्टाफ उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे.

सध्या रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांचा वाढता ओघ पाहता सध्याचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. दिवसाकाठी सुमारे दोन हजार रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यामुळै चार वर्षांचा बीएसस्सी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत प्रस्ताव नगरविकास विभागाला पाठवला आहे. नर्सिंग अभ्यासक्रम सुरू केल्यामुळे दरवर्षी सुमारे २०० नर्सिंग स्टाफ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कर्मचारी वाढल्यास रुग्णांच्या उपचाराची गैरसोय होणार नाही.

नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी. त्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात संलग्नता प्रमाणपत्र मिळण्याबाबत शासनाने सहकार्य करावे. त्यानंतर इंडियन नर्सिंग कौन्सिलची मान्यता घेवून अभ्यासक्रम सुरू करता येईल. पिंपरी-चिंचवड शहरातील आरोग्य सोयी-सुविधा सक्षम करण्याच्या दृष्टीने नर्सिंग अभ्यासक्रम संदर्भातील नगरविकास विभागाकडे असलेल्या प्रस्तावाला मान्यता द्यावी, असे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या घरात आहे. वाढत्या लोकसंख्येचे तुलनेत आरोग्य सुविधा सक्षम करणे काळाची गरज आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू झाला असून, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. त्याच्या जोडीला नर्सिंग स्टाफही उपलब्ध व्हावा. याकरिता नर्सिंग अभ्यासक्रम प्रस्तावित आहे. राज्याच्या नगरविकास विभागाकडे याबाबत प्रस्ताव आहे. त्याला मान्यता मिळाल्यास अभ्यासक्रम सुरू होईल. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करीत आहोत.