मुख्यमंत्री यांनी घेतला विकास कामांचा आढावा

0

मुंबई – युद्धपातळीवरील बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासकामांचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली. राज्यभरातील विविध प्रकल्प, नागपूर व पुणे मेट्रो, मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-३, समृद्धी महामार्गा अंतगर्त सुरु असलेली बांधकामे, मुंबईतील नागरी परिवहन प्रकल्प-३ अंतर्गत नेरूळ, बेलापूर येथील नवीन उपनगरी मार्गाच्या कामांचा आढाव्यासह इतर विविध कामांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत घेतला.

७ सिंचन प्रकल्प पूर्ण 

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग, अहमदनगर-बीड-परळी-वैजनाथ रेल्वे मार्ग, वडसा-गडचिरोली रेल्वे मार्ग यासंदर्भातील विविध समस्याही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाणून घेतल्या. मुंबई-नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी कॉरिडॉरसंदर्भात येणाऱ्या अडचणीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाणून घेतल्या. राज्यातील जलसिंचनाच्या कामांच्या प्रगतीबाबतचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी एक स्वतंत्र ट्विट करत घेतला. या ट्विटनुसार, राज्यातील १० सिंचन प्रकल्पांपैकी ७ प्रकल्प जवळपास पूर्ण झाले आहेत. या सात प्रकल्पांमध्ये नाशिकमधील ४, जळगावातील २ तर नागपुरातील एका प्रकल्पाचा समावेश आहे.

 

२०१९ पर्यंत काम पूर्ण होणार 

मेट्रो प्रकल्पाच्या आढाव्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले आहे. ज्यामध्ये नागपूर आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पांच्या कामाच्या प्रगतीविषयी माहिती देण्यात आली आहे. नागपूर मेट्रोचे ६० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित बांधकाम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे.

पुणे मेट्रोचे १५ काम पूर्ण 

यासोबतच पुणे मेट्रोच्या बांधकामाच्या प्रगतीविषयीची माहितीही ट्विटवर देण्यात आली आहे. पुणे मेट्रोचे केवळ १५ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून सप्टेंबर २०२१ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. दोन्ही शहरांच्या तुलनेत पुणे मेट्रोचे काम फारच संथगतीने सुरु असल्याचे दिसून येत आहे.