‘ती’ ऑडिओ क्लिप नीट ऐका: फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

0

नवी मुंबई: मूळची बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी असलेली आणि पुण्यात शिक्षण घेत असलेल्या पूजा चव्हाण हिने आत्महत्या केली. पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी शिवसेना नेते राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून विरोधी पक्ष भाजपने शिवसेनेला लक्ष केले आहे. या प्रकरणाशी संबंधित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे विरोधकांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर भूमिका मांडली होती. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ क्लिप ऐकण्याचा सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं वक्तव्य ऐकून त्यांनी या प्रकरणाची माहिती नीट घेतली नसल्याचं वाटतं. उद्धव ठाकरेंना गांभीर्य लक्षात आलेलं नाही. त्यांनी याप्रकरणाला गांभीर्यानं घेतलेले दिसत नाही. त्यांनी या प्रकरणाची नीट माहिती घ्यावी, क्लिप्स नीट ऐकाव्या म्हणजे कुणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय ते कळेल,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी केली जाईल. जे सत्य आहे ते बाहेर येईलच. यामध्ये ज्यांच्यावर कारवाईची गरज आहे त्यांच्यावर कारवाई होईल. गेल्या काही महिन्यांपासून एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जातो. असाही प्रयत्न होता कामा नये आणि सत्यही लपवण्याचा प्रयत्न होता कामा नये. यामध्ये जे सत्य असेल ते संपूर्ण चौकशी करून जनतेसमोर येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले होते.