वॉशिंग्टन : चीनच्या २०० अब्ज डॉलर किमतीच्या वस्तूंवर आयात कर लागू करण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. चीनने व्यापारात गैरमार्ग अवलंबण्याचे थांबवले नाही तर आयात शुल्क लादण्यात येईल असे ट्रम्प यांनी सांगितले.
अमेरिका व चीन यांच्यात व्यापार युद्ध सुरू असून, गेल्या आठवडय़ात ५० अब्ज डॉलरच्या चिनी वस्तूंवर कर लादण्याचे अमेरिकेने जाहीर केल्यानंतर चीनने अमेरिकेच्या ५० अब्ज डॉलरच्या ६५९ वस्तूंवर कर लादण्याचे जाहीर केले होते. ट्रम्प यांनी काल जारी केलेल्या एका निवेदनात अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लायथिझर यांना कुठल्या चिनी वस्तूंवर १० टक्के आयात कर लावता येईल याचा शोध घेण्यास सांगितले आहे. अन्यायकारक व्यापार पद्धती बदलण्याऐवजी चीन आता अमेरिकी कंपन्या, कामगार व शेतकरी यांना धमकावत आहे.