पेव्हर ब्लॉकचे काम चुकीच्या पद्धतीने केल्याचा ठपका
चोपडा(प्रतिनिधी)- येथील बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र सदरील काम हे तांत्रिक बाबींची पूर्तता न करताच चुकीच्या पद्धतीने करण्यात येत असून यामुळे भविष्यात गटारीत पाणी तुंबून व्यापार्यांचे नुकसान होईल म्हणून या संदर्भात येथील सोने चांदी या गहना घर चे संचालक सुशील सोहनराज टाटिया यांनी दि १६ रोजी न.पा. चे मुख्याधिकारी यांना ऍड. अशोक जैन यांच्या मार्फत रजिस्टर पोस्टाने कायदेशीर नोटीस पाठविली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,गेल्या अनेक दिवसांपासून मुख्य रस्ता हा खड्डेमय झाला होता न.पा. हद्दीतून सा. बा. विभागात हा रस्ता वर्ग झाल्याने रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता अशीच काहीशी परिस्थिती या शहरातील मुख्य रस्त्याची झाली होती. याचे गांभीर्य ओळखून आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी स्थानिक विकास निधीतुन जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याकडे शिफारस करून संजय घोडगावकर यांच्या घरापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत या कामासाठी ३४ लाख रुपये निधी मंजूर केला. दि.१७ फेब्रुवारी रोजी माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करून कामास सुरवात करण्यात आली.
ठेकेदाराचा मनमानी कारभार
रस्ता न खोदताच पेव्हर ब्लॉक लावल्यामुळे रस्त्याची उंची सुमारे ८ इंचने वाढली आहे. तसेच गटारींवरील ढापे व सांडपाण्यासाठी असलेले छिद्र ठेकेदाराने वारंवार सांगितल्यानंतरही बुजून टाकले आहेत. आमदार निधीतून होत असलेल्या या कामाचे चोपडा नगर परिषद राजकारण करीत असून या कामावर मुख्याधिकारी, नगर अभियंता, जबाबदार अधिकारी कुणीही फिरकलेले नाहीत. म्हणून ठेकेदार मनमानी कारभार करून चुकीच्या पद्धतीने पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम करीत असल्याचे सुशील टाटिया यांनी नोटीसीत म्हटले आहे. सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जीवन चौधरी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी या बाबतीत ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली, असेही सुशील टाटिया यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. परंतु चुकीच्या पद्धतीने होत असलेले काम थांबविण्यासाठी अधिकार असतांना काहीही पाऊल उचलण्यात आली नाहीत याची खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. ढापे पेवर खाली पुरुन टाकल्याने आता कचराने तुडुंब भरलेल्या गटारी कशा साफ होतील आणि सांडपाणी व पावसाचे पाणी गटारीत कसे जाईल याचे उत्तर कुणाकडेही नाही वा कुणालाही त्याची तमा नाही. रस्त्यावरील पाणी वाट न मिळाल्याने दुकानांमध्ये शिरुन आतोनात नुकसानीस व्यापार्यांना सामोरे जावे लागणार आहे. म्हणून परिसरातील दुकानदारांनी वेळीच खबरदारीचे उपाय करून नगर परिषदेच्या या बेजबाबदार कारभाराचा उघड विरोध करावा असे आवाहन करीत नागरिकांना मूलभूत सोयी पुरविण्याऐवजी जनतेसमोर गंभीर समस्या निर्माण करणार्या नगर परिषद प्रशासन विरोधात दाद मागण्यासाठी नाईलाजाने न्यायालयात जाण्याचा निर्णय घ्यावा लागला असेही सुशील टाटिया यांनी बोलतांना सांगितले.