मुंबई : सीआयएससीईकडून घेण्यात आलेल्या दहावी आयसीएसई व बारावी आयसीएस परीक्षेचा निकाल आज (सोमवारी) जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये मुंबईकरांनी बाजी मारली आहे. बारावीच्या परीक्षेत मुंबईचा अभिज्ञान चक्रवर्ती याने देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे. तर दहावीत कोपरखैरणेच्या सेंट मेरी शाळेतील स्वयं दास याने ९९.४४ टक्के गुण मिळवून देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे.
हे देखील वाचा
या वर्षी आयसीएसईची परीक्षा २६ फेब्रुवारी ते १२ एप्रिल या कालावधीत घेण्यात आली होती. आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ९८.५१ टक्के तर बारावीच्या परीक्षेचा निकाल ९६.२१ टक्के लागला. बारावीच्या परीक्षेला १०.८८ लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ९६.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दहावीच्या परीक्षेला १६ लाख विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ९८.५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १२ वीच्या परीक्षेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.६३ टक्के तर मुलांचे ९४.९६ टक्के इतके आहे. १० वीमध्ये मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.९५ टक्के आणि मुलांचे ९८.१५ टक्के इतके आहे.
१२ वीत मुंबईच्या लीलावतीबाई पोदार हायस्कूलमधील अभिज्ञान चक्रवर्ती याने बाजी मारली आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या ७ विद्यार्थ्यांमध्ये २ विद्यार्थी मुंबईचे आहेत. दुसऱ्या क्रमांकावर १७ विद्यार्थी असून त्यातही २ विद्यार्थीं मुंबईचे आहेत. तिसºया क्रमांकावर २५ विद्यार्थी असून त्यातही २ विद्यार्थी मुंबईचे आहेत. आयसीएस दहावीच्या परीक्षेतही मुंबईच्या मुलांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे.